नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी निलंबित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळाच्या चर्चेदरम्यान विरोधकांना उत्तर देत असताना शेतक-यांना दिलेल्या पॅकेजवरून जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला धारेवर धरत गोंधळ घातल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. यावेळी त्यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचे समजते.
दुष्काळावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्याच आरोप-प्रत्यारोप सुरु होते. त्याचवेळी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घालायला सुरुवात केली. सुरुवातीला कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच आव्हाड यांनी वेलमध्ये जाऊन गोंधळ घातला. यादरम्यान कामगारमंत्री प्रकाश मेहता आणि आव्हाड यांच्यात बाचाबाची झाली. आव्हाडांनी त्यावेळी असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप सत्ताधा-यांनी केला. अखेर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी जितेंद्र आव्हाड यांचे हिवाळी अधिवेशन पूर्ण होईपर्यंत निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. जो विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मान्य केला. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी निषेध व्यक्त करीत सभात्याग केला.
निलंबनाबाबत आव्हाडांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, मी विधानसभेत काहीही चुकीचा वागलो नाही. असंसदीय भाषा वापरली नाही. विधानसभेत मी कसलाही गोंधळ घातला नाही. हा, मी सरकारला वेगवेगळ्या मुद्यांवरून अडचणीत आणले आहे. सभागृहातही आणि सभागृहाबाहेरही. नथुराम गोडसेंचा प्रश्न मीच उपस्थित करून सभागृहात मुद्दा मांडला. त्यामुळे अडचणीत आलेल्या सरकारने बदला घेण्याच्या भूमिकेतून माझे निलंबन केले आहे. काही हरकत नाही तसाही मी रस्त्यावरीलच कार्यकर्ता आहे. सरकारविरोधातील सभागृहातील लढाई आता रस्त्यावर लढू अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.