आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम शिवसेनेच्या संपर्कात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अाघाडी सरकारच्या कार्यकाळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या अफरातफरप्रकरणी सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगाच्या न्यायालयीन कोठडीत असलेले सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम सध्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती अाहे.
शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्याला पक्षप्रवेशाची आॅफर दिली आहे, असा दावा खुद्द कदम यांनीच ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केला. शिवसेनेकडून मात्र त्याला अधिकृत दुजाेरा मिळालेला नाही.
१८ जुलै रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) कदम यांच्यावर दोन गुन्हे नोंद केले होते. तेव्हापासून फरारी असलेल्या कदम यांना १८ आॅगस्ट रोजी पुण्यात अटक झाली. त्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. कदम सध्या भायखळ्याच्या आर्थर रोडमध्ये आहेत. ‘भ्रष्टाचाराचे अाराेप व कारवाई झाल्यानंतर पक्षाने आपल्याला नोटीस न देता निलंबित केले, अडचणीच्या काळात मदत केली नाही,’ असा कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप आहे. कदम यांना राष्ट्रवादीतून बाहेर पडायचे आहे. मात्र, सध्या ते पक्षातून निलंबित आहेत. पक्षातून त्यांना काढलेले नाही. या स्थितीत त्यांंनी पक्षांतर केल्यास त्यांचे राज्य विधिमंडळ सदस्यत्व संपुष्टात येऊ शकते.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रमेश कदम यांनी अापल्या मतदारसंघातील काही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात सदस्य उभे केले होते. त्यावरून राष्ट्रवादीशी त्यांचे पूर्ण बिनसलेले असल्याचे स्पष्ट हाेते. कदम एकीकडे इतर पक्षात जागा शोधत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेला कदम यांच्यासारखा मातंग नेता गळाला लागला तर हवाच अाहे.

शिवसेनेचा डाेळा मातंग समाजावर
मातंग समाज शिवसेनेचा आजपर्यंत पारंपरिक मतदार राहिला आहे. अनुसूचित जातीसाठी राज्यात २९ जागा आरक्षित अाहेत. यावेळच्या विधानसभेत १६ चर्मकार, ९ नवबौद्ध, तर तीन मातंग समाजाचे आमदार आहेत. भाजपकडे दोन मातंग आमदार असून स्वत: कदम राष्ट्रवादीचे आहेत. शिवसेनेला मातंग नेतृत्वाची उणीव आहेच. त्यामुळे कदम यांच्यासाठी शिवसेना पायघड्या घालू शकते, असे शिवसेनेतील एका नेत्याने ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

अजित पवारांचे कट्टर समर्थक हाेते अामदार रमेश कदम
राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी अामदार रमेश कदम यांची अाेळख अाहे. साेलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री लक्ष्मण ढाेबळे यांचे बाेट धरून राजकारणात अालेल्या कदम यांनी नंतर ढाेबळे यांच्यावरच शिरजाेरी करत पक्षात अापले स्थान निर्माण केले. गेल्या काही वर्षांत पक्षात अजित पवारांचे वर्चस्व वाढत असल्याची संधी साधत कदम यांनीही मग अजितदादांशी जवळीक वाढवत अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद मिळवले. पवारांच्या अाशीर्वादानेच कदम यांनी काेट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा अाराेप हाेत अाहे. मात्र, अाता अडचणीच्या काळात पवारांकडून मदत केली जात नसल्याने कदम यांनी दुसऱ्या पक्षात ‘घराेबा’ करण्याची तयारी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा अाहे.