मुंबई - मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात पोलिस उपनिरीक्षकास अश्लील भाषेत शिवीगाळ करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांनी आपल्याला पोलिस खात्याविषयी नितांत आदर असल्याचे सांगत नरमाईची भूमिका घेतली. कदम यांची मंगळवारी गृह विभागात सुनावणी होती. या वेळी आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे त्यांनी खंडन केले.
काही दिवसांपूर्वी पोलिसांना शिव्या देताना कदम यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर कदम म्हणाले, मला पोलिस खात्याविषयी नितांत आदर आहे. मात्र, संबंधित उपनिरीक्षकाने माझ्याकडे लाचेची मागणी केली होती. मी त्याबाबतचे पुरावेही दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. कदम यांच्यावर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात ३१५ काेटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. आपल्यावर २०१५ मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने घोटाळ्याचा गुन्हा दाखल केला. मी आमदार या नात्याने लोकसेवक आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करताना अन्वेषण विभागाने सक्षम प्राधिकरणाकडून (विधानसभा अध्यक्ष) संमती घेतली नाही.
त्यामुळे आपल्यावरील गुन्हाच बेकायदा ठरतो, असा दावा कदम यांनी केला. मी जो भ्रष्टाचार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील १५० कोटी रुपयांची वसुली केल्याचे अन्वेषण विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र, मी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. ३१५ कोटींच्या भ्रष्टाचाराचा जो माझ्यावर आरोप आहे, ती पूर्ण रक्कम कर्जवाटप करण्यात आली होती, असे कदम म्हणाले. गृहसचिवांची भेट घेण्यासाठी सत्र न्यायालयाने कदम यांना अनुमती दिली होती. त्यानुसार मंगळवारी कदम ऑर्थर रोड तुरुंगातून मंत्रालयात पोहोचले. पोलिसी पहाऱ्यात सुनावणीसाठी आरोपींना न्यायालयात नेहमीच आणले जाते. मात्र, पोलिसी पहाऱ्यात एखादा आरोपी मंत्रालयात येण्याची पहिलीच वेळ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.