आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Mla Sanjay Kaka Patil In Bjp News In Marathi

मुंडेंचा पवारांना हाबाडा;आमदारकीचा राजीनामा देत संजय पाटील भाजपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याचा शब्द खरा करून दाखवत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी पवार काका- पुतण्याला हाबाडा दिला. तासगावचे (जि. सांगली) संजय काका पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे आणखी दोन नेते फुटणार असल्याची घोषणा मुंडे यांनी केली."

राष्ट्रवादीचे मुंबई उपाध्यक्ष दिलीप माने, सटाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय वसंतराव पाटील, दलित संघटक अमिम उजगरे यांनाही भाजपात प्रवेश केला.

मुंडे म्हणाले, आर. आर. यांच्या जाचाला कंटाळून संजय पाटील यांच्यावर राष्ट्रवादीला रामराम करण्याची वेळ आली. त्रासाविषयी त्यांनी शरद पवार तसेच अजित पवार या दोघांनाही वारंवार कळवले होते. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. लोकसभेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीत प्रचंड असंतोष उफाळून येईल आणि त्या वेळी या पक्षाला आणखी मोठे खिंडार पडलेले असेल.

आबांचा पर्दाफाश करणार : आबा दिसतात तसे साधे नाहीत. धमकावण्याची भाषा त्यांनी सुरू केली आहे. आबांचे रूप दाखवले जाते, ते बेगडीपणाचे असून त्याचा पर्दाफाश लवकरच केला जाईल. तासगाव येथे भाजप पक्ष प्रवेशावेळी आबांचा खोटारडा मुखवटा टराटरा फाडला जाणार आहे, असे संजय पाटील म्हणाले.

निरोपाचा रामराम!
‘या वरिष्ठ सभागृहात मी बरेच शिकलो. गृहमंत्री आर. आर. यांनी माझी कोंडी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष त्यागण्याचा मी निर्णय घेतला आहे. ही बैठक संपताच सभागृह सदस्यत्वाचा राजीनामा मी सभापतींना सादर करीन. सहकार्याबद्दल सर्वांचे आभार’, असे म्हणत संजय पाटील यांनी विधान परिषदेला मंगळवारी अलविदा म्हटले.

विनायक मेटेंवरही नजर
‘आमदार विनायक मेटे यांची मराठा आरक्षणासाठी सुरू केलेली लढाई योग्य आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे, या त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे’, असे मुंडे यांनी स्पष्ट केले. सध्या राष्ट्रवादीत असलेले विनायक मेटेही भाजपमध्ये येणार का, असे विचारले असता आमची मेटेंवरही नजर असल्याचे मुंडे म्हणाले.