आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Near About Done Loksabha Candiate For His 22 Seats

राष्ट्रवादीचे लोकसभेचे बहुतेक उमेदवार निश्चित, बीड- माढ्याचा तिढा कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी घेत आपल्या 22 जागांच्या कोट्यातील बहुतेक उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. काँग्रेससह भाजप-सेनेच्या पातळीवर सामसूम असताना राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर करून या पक्षांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 22 पैकी 16 मतदारसंघांतील उमेदवारांची नावे निश्‍चित झाली आहेत तर, हातकणंगलेसह चार मतदारसंघ अदलाबदलीची तयारी राष्ट्रवादीने ठेवली आहे. तर माढा आणि बीड या दोन लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचा तिढा अद्याप कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिरूर मतदारसंघातून देवदत्त निकम यांच्या उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे तर मावळमधून लक्ष्मण जगताप यांचे नाव जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिक, अहमदनगरमधून राजीव राजळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, नाशिकमधून छगन भुजबळ, भंडारा-गोंदियातून प्रफुल्ल पटेल, सातारामधून उदयनराजे भोसले, उस्मानाबादमधून पद्मसिंह पाटील, ठाण्यातून संजीव नाईक, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, कल्याणमधून आनंद परांजपे, परभणीतून विजय भांबळे, अमरावतीतून दिनेश बूब, बुलढाण्यातून रेखा खेडेकर, रावेरमधून अरूण गुजराथी, दिंडोरीतून ज्योती पवार, जळगावमधून सतीश पाटील यांची नावे निश्चित झाली आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात हातगणंगलेची जागा देण्यास राष्ट्रवादीची तयारी आहे. मात्र, काँग्रेसला हतगणंगले नको आहे. काँग्रेसने रायगडच्या बदल्यात कोल्हापूर मागितले आहे. मात्र महाडिक यांच्यासाठी राष्ट्रवादी मागे हटण्यास तयार नाही. दुसरीकडे रायगडच्या बदल्यात एकवेळ हिंगोलीची जागा राजीव सातव यांच्यासाठी सोडण्याची तयारी असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. तसे झाल्यास रायगडमधून सुनील तटकरे व हातगणंगलेमधून जयंत पाटील यांच्या गळ्यात उमेदवारी पडेल.
बीड लोकसभेच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. जयदत्त क्षीरसागर यांनी मुंडेंच्या विरोधात लढण्यास नकार दिल्याने धस यांचेही नाव पुढे येत आहे. मात्र, मुंडेंचा पराभव करायचा असेल तर क्षीरसागरच हवे आहेत याची जाणीव पक्षनेतृत्त्वाला आहे. त्यामुळे क्षीरसागर यांनाच तयारीचे आदेश देण्यात आले आहेत. माढामधून विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव आघाडीवर आहे, पण पक्षातंर्गत वाद उफाळल्याने ते अद्याप निश्चित झाले नाही. माढयाचा तिढा सोडविण्याबाबत मुंबईत बैठक बोलविण्यात आली आहे. त्यावेळी पवार मोहिते-पाटलांच्या पक्षातंर्गत विरोधकांची समजूत काढतील व मोहितेंचे नाव निश्चित केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.