आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे घोडे अडले सातार्‍याच्या जागेवर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांचे उमेदवार ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोर बैठका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर रविवारीही सुरूच होत्या. मात्र या बैठकांना बे्रक बसला तो सातार्‍यातील उमेदवारीवरून. उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे याआधी ठरले असले तरी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे आल्यामुळे सातार्‍याचे घोडे अडलेले दिसले. विशेष म्हणजे उदयनराजेंच्या उमेदवारीला स्थानिक पदाधिकार्‍यांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता पुण्यात 27 फेब्रुवारीला या जागेचा फैसला होणार आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी तसेच रविवारी झालेल्या या बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख नेते, मंत्री हजर होते. नाशिकमधून समीर भुजबळ, दिंडोरीतून ए.टी.पवार यांच्या नावावर रविवारी शिक्कामोर्तब झाले. त्याचबरोबर माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील तसेच बुलडाण्यामधून राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

उदयनराजे भोसले यांचीही या बैठकीत मुलाखत झाली. मात्र सातार्‍यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधाचाही विचार झाला पाहिजे, असे शेवटी निर्णय घेण्यात आला. माढ्यातून मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यामुळे या जागेवर दावा करणारे रामराजे निंबाळकर नाराज झाले आहेत. आता त्यांनी सातार्‍यातून उमेदवारी मिळावी, म्हणून पक्षांतर्गत दबाव आणण्यास सुरुवात केली असून यासाठी स्थानिक पदाधिकार्‍यांना पुढे केले आहे.

छगन भुजबळांचे नाव मागे
राज्यातील मंत्र्यांना दिल्लीत पाठविण्याची योजना पवारांनी आखली होती. त्यानुसार बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्याची चर्चाही पक्षीय पातळीवर रंगली होती. मात्र रविवारी या मतदारसंघाबाबत झालेल्या चर्चेत अखेर छगन भुजबळांचे नाव मागे पडून विद्यमान खासदार समीर भुजबळांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजेंचा फैसला पुण्यात
खासदार असूनही राष्ट्रवादीला वेळावेळी अडचणीत आणणार्‍या उदयनराजेंना डावलल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, यावरही बैठकीत ऊहापोह झाला. सातार्‍याचा तिढा सोडवण्यासाठी 27 फेबु्रवारीला पुण्यात होणार्‍या बैठकीला स्वत: शरद पवार उपस्थितीत राहणार आहेत.

अदलाबदलीची आस
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही जागांवर अदलाबदल करण्याचे प्रयत्न अद्याप दोन्ही पक्षांनी सोडलेले नाहीत. काही जागांवर अजूनही मार्ग काढण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी बैठकीनंतर सांगितले.