आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळात राष्ट्रवादी देणार आक्रमक प्रत्युत्तर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागितल्यावर व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांचे कान उपटल्यानंतरही शिवसेना- भाजपचे आमदार पवारांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. विधिमंडळ अधिवेशनात आजवर त्याचे पडसाद उमटले असून, सोमवारीही त्याची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. मात्र, विरोधकांच्या या मागणीला आक्रमक प्रत्त्युत्तर देण्याची रणनीती राष्ट्रवादीने आखली असल्याचे समजते.

अजित पवार यांनी आज केलेले उपोषण हा योग्य मार्ग असून संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. आपली चूक एवढय़ा मोठय़ा मनाने कबूल केल्यावर आणखी काय हवे, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे विरोधकांनी कामकाजामध्ये अडथळे निर्माण केले तर राष्ट्रवादीचे आमदारही आक्रमक होतील, अशी प्रतिक्रिया एका आमदाराने दिली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही या प्रकारावर भाष्य केले असून त्यांचा शब्द हा अंतिम असतो. अशावेळी या मोठय़ा नेत्याच्या बोलण्याचा मान ठेवायलाच हवा. मात्र, विरोधक सतत अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आमच्या नेत्याला अशापद्धतीने कोणी मुद्दाम लक्ष्य करत असेल तर त्याच पद्धतीने उत्तर द्यावे लागेल, असे राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याने सांगितले.

पॉलिटिकली इनकरेक्ट..!
‘अजितने माफी मागितल्यानंतर हा विषय संपायला हवा,’ असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारीच सांगितले. त्यानंतर अजित पवारांनी आत्मक्लेशाचे प्रदर्शन मांडण्याची गरज नव्हती. यामुळे त्यांनी केलेले अनुचित विधान पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. विरोधकही पुन्हा आक्रमक झाले. सोमवारी विधिमंडळात याचे पडसाद उमटतील व ही चर्चा सुरू राहील. जाहीरपणे आत्मक्लेश करून घेण्याचे पवारांचे पाऊल हे अनावश्यक आणि ‘पॉलिटिकली इनकरेक्ट’ असल्याचे मत राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे.

आयुष्यात प्रथमच उपोषण
सन 1991 मध्ये बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत अजित पवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतरच्या तब्बल 22 वर्षांत युती शासनाची साडेचार वर्षे वगळता ते अखंडपणे सत्ताधारी आहेत. या काळात जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी कधीच उपोषणाचा मार्ग स्वीकारला नाही. त्यांच्या आयुष्यातले पहिलेच उपोषण स्वत:च्याच चुकीचे परिमार्जन करण्यासाठी पार पडले.