आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघ, तालिबानी नेत्यांत 2005 मध्ये संशयास्पद बैठक- नवाब मलिकांचा सनसनाटी आरोप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तालिबान सर्मथक पाकिस्तानचे नेते मौलाना फजलूर रहमान, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते यांच्यात जून 2005 मध्ये झालेली बैठक संशयास्पद असून त्याचा तपशील उघड करण्याची मागणी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. मलिक यांच्या आरोपांमुळे प्रदेश भाजपच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. अनेक नेत्यांना या बैठकीचा काही थांगपत्ताच नसल्याने त्यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांशी संपर्क साधला.

पाकिस्तानचे तत्कालीन विरोधी पक्षनेते म्हणून रहेमान यांनी भारताचे विरोधी पक्ष नेते अडवाणी यांची 1 जून 2005 मध्ये भेट घेतली होती. त्याच दिवशी संघाच्या मुख्यालयामध्ये तीन तास सरसंघचालकांसोबत, इतर संघाचे नेते आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांच्या उपस्थितीतही आणखी एक बैठक झाली. मात्र संघ परिवाराने या दोन्ही बैठकींचा तपशील दडवून ठेवला आहे. एका तालिबान सर्मथकाबरोबर संघाने अशापद्धतीने गुप्त बैठक का घेतली, हे त्यांनी उघड करावे, अशी मागणी मलिक यांनी यावेळी केली. मात्र या दोन्ही बैठकींमुळे दहशतवादी संघटना व संघ परिवार यांच्यामध्ये काही संबंध आहे का, असा संशय निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. सध्या भाजपने देशभर सुरू केलेल्या दहशतवाद विरोधी आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी या बैठकींचा उल्लेख करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप आणि संघ परिवाराचा दहशतवादाशी संबंध असल्याचे वक्तव्य केल्याने दोन्ही संघटनांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. त्यासाठी देशभर शिंदेंच्या विरोधात निदर्शने सुरू करण्यात आली. मात्र ही निदर्शने करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नसल्याचे मलिक यांनी सांगितले. याआधीही देशामध्ये झालेल्या काही दहशतवादी कृत्यांमध्ये संघातील लोक संबंधित असल्याचे उघड झाले आहे. त्यातील काही अटकेत आहेत तर काहींची चौकशी सुरू आहे. त्यामुळे भाजप दहशतवादाचा उपयोग केवळ राजकीय फायद्यासाठी करून घेत असतो, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या आवाहनानंतर ही निदर्शने होत असल्याबद्दलही मलिक यांनी टीका केली. दहशतवादी म्हणून अटकेत असलेल्या काहींना भेटण्यासाठी राजनाथ सिंग स्वत: गेले होते. मग दहशतवादाविरोधात निदर्शने करण्याचे आदेश ते कसे देऊ शकतात, असा सवाल मलिक यांनी भाजपला केला. आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागेल.

महिलांना चाकू, मिरची वाटणे हास्यास्पद- महिलांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेने महिलांना चाकू आणि मिरची पूड वाटणे हास्यास्पद असल्याचे मलिक यांनी या वेळी सांगितले. दिवंगत शिवसेनाप्रमुखांनी महिलांनी केवळ चूल आणि मूल सांभाळावे, असे एकदा सांगितले होते. त्यामुळे या दोन्हीचा उपयोग शिवसेनेच्या दृष्टिकोनातून महिलांना केवळ स्वयंपाक घरातच होऊ शकतो. सुरक्षेसाठी समाजाची मानसकिता बदलायला हवी आणि महिलांना आधार द्यायला हवा, असे त्यांनी सांगितले.