आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Party Worker Demands To Decleared Candiates Of Cm Post

शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा- पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात यावे अशी मागणी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी केली आहे. पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले व अंकुश काकडे यांनी पक्षाच्या बैठकीत ही मागणी केल्याचे समजते. याचबरोबर विधानसभा निवडणुका काँग्रेससोबत लढविण्यापेक्षा स्वबळावरच लढवावी असा पक्षातील पदाधिका-यांचा सूर येत आहे.
लोकसभा निवडणुकीत पाणीपत झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त होत असून त्यामुळेच शरद पवारांना सर्वसुत्रे हाती घेण्याचे साकडे घातले जात आहे. त्यामुळे अजितदादांचे पंख छाटण्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीत सुरु आहे. पवारांनी पक्षाची सूत्रे हातात घेतल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या लोकांनाही धाडस आले असून आता उघडपणे त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. अजित पवार यांनी नुकतीच एका वर्तमानपत्राला मुलाखत देऊन पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणूकीपूर्वी जाहीर करावा अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर स्वत: शरद पवार यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे, अशी मागणी पुढे आली आहे. पुणे जिल्ह्याच्या बैठकीत पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी शरद पवार यांचेच नाव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे, अशी मागणी त्यांच्यासमोरच केली. बैठकीत यावर फार चर्चा झाली नाही परंतू नंतर मात्र बाहेर यावरून चर्चेला उधाण आले होते. पवार यांनी बैठकीत या मागणीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने चर्चेला जोर चढला आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या शरद पवारांनी पक्षाच्या विरोधात गेलेल्या सर्व समाजघटकांना जोडून घेण्याचे नेत्यांना आदेश दिले. याचबरोबर जिल्हास्तरीय नेत्यांकडून प्रत्येक जिल्ह्याची बारीक-सारीक माहिती घेऊ लागले आहेत. काल पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील पदाधिका-यांशी पवारांनी चर्चा केली. यावेळी पक्षाने स्वबळावर लढल्यास पक्षाला अधिक फायदा होईल असे पवारांना सांगितले. त्यानुसार पवारांनीही 288 विधानसभा मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेण्याचे फर्मान सोडले आहे.
पक्षाच्या दारूण पराभावानंतर पवारांनी प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात ठाण मांडले आहे. विधानसभा निवडणुकीची सारी सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली आहेत. त्याचाच भाग म्हणून पवार सर्व जिल्ह्यातील नेत्यांना व पदाधि-यांशी थेट चर्चा करीत आहेत. त्याचवेळी पदाधिका-यांनी पक्षाने स्वबळावर लढावे अशी मागणी रेटली. यावर पवारांनीही पक्ष स्वबळावर लढल्यास पक्षाला किती जागा मिळतील अशी विचारणा केली. त्यातूनच पुणे जिल्ह्यातील पदाधिका-यांनी पक्षाकडे पुणे जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवार यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे अशी मागणी केली. यात माजी महापौर अंकुश काकडे व राजलक्ष्मी भोसले यांचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत पक्षातून कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही.