आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांच्या कामांच्या नावाने राष्ट्रवादीचा जोगवा, प्रचारात काय सांगायचे हा राष्ट्रवादीपुढे प्रश्न!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नरेंद्र मोदी यांना पुढे करून त्यांनी गुजरातमध्ये केलेल्या कामांची जंत्री जनतेसमोर मांडत मते मागणार्‍या भाजपचे अनुकरण करत आता राष्ट्रवादीही आपल्या नेत्याने केलेली कामे पुढे करून मते मागणार आहे. याचा अर्थ सध्याचे कर्तेधर्ते अजित पवार, आर.आर. पाटील यांच्या नावाने मते मागितली जाणार असा मात्र नव्हे. घोटाळ्यांच्या मालिकेत अडकलेल्या राष्ट्रवादीच्या सध्याच्या नेतृत्वाचे कतरुत्व सांगून मते मिळण्याची खात्रीच नसल्याने 20-30 वर्षांपूर्वी शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयांच्या आधारावर मतांचा जोगवा मागण्याची पाळी राष्ट्रवादीवर आली आहे.
या दृष्टीने राष्ट्रवादीने डावपेच आखले आहेत. पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनाच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची केलेली मागणी राष्ट्रवादीच्या भावी वाटचालीचे संकेत देणारी आहे. 1995 नंतर म्हणजे वीस वर्षांपासून पवार राज्याचे मुख्यमंत्री किंवा थेट सत्तेत नाहीत. तरीही 20 ते 30 वष्रे जुन्या कढीला ऊत आणून ती मतदारांना वाटण्याच्या प्रकाराला मतदार प्रतिसाद देतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जनतेसमोर जाण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मुद्देच नाहीत. जलसंपदातील भ्रष्टाचार, टोलवरून जनतेत रोष आहे. त्यातच मोदी फॅक्टरमुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची वाताहात झाली. राष्ट्रवादीतील सूत्रांनुसार, विधानसभा निवडणुकांसाठी मोठय़ा प्रमाणावर जाहिराती तयार केल्या जातील. यात गेल्या 15 वर्षात सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांचा समावेश केला जाणार आहे. परंतु, यामध्ये सगळ्यात जास्त वाटा शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदी असताना केलेल्या कामांचा असेल. त्या काळातील कामांची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनसंपर्क विभागाला पत्र पाठवून मागवली आहे.

मुंडे असते तर..
भाजपचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे जर आज जिवंत असते तर विधानसभा निवडणूक जिंकणे कठीण झाले असते, असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. गोपीनाथ मुंडे यांना संपूर्ण राज्यातील मतदारसंघाची माहिती होती. कुठल्या मतदारसंघात कोणता समाज मोठा आहे, त्याला एकत्र कसे करायचे याची माहिती त्यांना होती तसेच सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचे कसबही त्यांच्याकडे होते. भाजपच्या आत्ताच्या एकाही नेत्याला संपूर्ण राज्याची माहिती नाही. गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत आम्हाला सहजा-सहजी विजय मिळवू दिला नसता, परंतु आता आम्हाला विजय मिळवणे सोपे वाटू लागले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे गणित वेगळे असते. विधानसभेत आमदारांचे काम महत्वाचे असते त्यामुळे आमच्या जास्तीत जास्त जागा नक्कीच जिंकून येतील असेही या नेत्याने सांगितले.
एकूणच लोकसभा निवडणूक निकालापासून धडा घेत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेसाठी जोमाने कामाला लागल्याचे दिसून येते.
लोकराज्यच्या अंकांचा आधार
शरद पवार यांच्या काळातील लोकराज्यचे अंक आणि घेतलेल्या निर्णयांची माहिती व चित्रफिती 25 जूनपर्यंत उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला देण्यात याव्यात, असे पत्रच 12 जूनला पाठवण्यात आले. जनसंपर्क विभागाने ही माहिती उपमुख्यमंत्र्यांकडे पोहोचवल्याचेही सूत्रांनी सांगितले.

नामांतर, मंडल आयोग..
शरद पवार मुख्यमंत्रिपदी असताना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले. मंडल आयोग लागू झाला. महिलांसाठी आरक्षण व महिला धोरण सर्वप्रथम राबवले होते. पक्षाला त्याचा फायदा झाला होता. मंडल आयोगाला बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केल्यामुळेच छगन भुजबळ शरद पवारांच्या हाताला लागले होते. शेतकर्‍यांसाठीही हॉर्टिकल्चर पॉलिसी शरद पवार यांनी आणली. त्यामुळे फळ शेतीला आधार मिळाला आणि फळांमध्ये राज्य आघाडीवर आले. ड्रीप इरिगेशनमुळेही शेतकर्‍यांना फायदा झाला. या सर्व गोष्टींचा वापर निवडणूक प्रचारात केला जाणार असून शरद पवार यांचाच चेहरा पुढे केला जाईल.