आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP President Sharad Pawar Takes Resignation Of His Parties Ministers

निवडणुकीची मोर्चेबांधणी: शरद पवारांचे धक्कातंत्र; सर्वच मंत्र्यांचे राजीनामे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीच्या सर्व 20 मंत्र्यांचे राजीनामे घेतले. राज्य मंत्रिमंडळाबरोबरच पक्षसंघटनेतही मोठ्या फेरबदलाचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहर्‍याला संधी देणार असल्याचेही पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकांपूर्वीची ही मोर्चेबांधणी असल्याचे मानले जात असून राजीनामा घेतलेल्या मंत्र्यांमधील काही तगड्या नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊन काहींना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात येणार आहे. पक्षातील काही नवीन चेहर्‍यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसच्या दिल्लीत बैठका
राष्ट्रवादीच्या धक्कातंत्रामुळे रखडलेला मंत्रिमंडळातील फेरबदल आता प्रत्यक्षात येईल. काँग्रेसकडून अद्याप फेरबदलाबाबत काहीच संकेत नसले तरी राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे आता दबाव निर्माण होऊन बदल करावेच लागतील. साध्या महामंडळांवर नियुक्त्या न करणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या गोटात खळबळ माजली असून त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठीच राजीनामे घेतल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणतात. सध्या काँग्रेसची दोन मंत्रिपदेही रिक्त आहेत. दिल्लीमध्ये याबाबत काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरू असल्याचेही समजते.

‘राजीनामे म्हणजे नौटंकी’
औरंगाबाद- राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्यामुळे शरद पवारांना निवडणुकीची काळजी लागली असावी. त्यामुळेच त्यांनी
मंत्र्याचे राजीनामे घेतले असावेत, अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. राजीनामे म्हणजे केवळ नौटंकी असून राज्यपालाकडे राजीनामे का दिले नाहीत, अशी टीका शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केली. राष्ट्रवादीमध्ये धुसफूस वाढली असावी. त्यामुळे केवळ दबावतंत्र म्हणून पवारांनी ही खेळी केली असल्याचे मत भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी याबाबत अतिशय सावध पवित्रा घेतला. लोकसभेसाठी ही पूर्वतयारी असल्याचे सांगत काही नेत्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याने कदाचित हे राजीनामा घेतले असावेत, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. जयदत्त क्षीरसागर आणि फौजिया खान या मंत्र्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

संघटना बळकट करण्यासाठी निर्णय
पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठीच शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या 15 तारखेला त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.
- मधुकर पिचड, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी

फेरबदलासाठी राजीनामे
मुंबईतील बैठकीत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने फेरबदलाची चर्चा झाली. त्यानुसार राजीनाम्याचाही विषय आला. राष्ट्रवादीच्या सर्व 20 मंत्र्यांनी पक्ष नेतृत्वाकडे राजीनामे दिले आहेत.
- प्रकाश सोळंके, राज्यमंत्री, महसूल व सहकार

पक्ष मजबुतीसाठी बदल
राष्ट्रवादीच्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हे बदल आहेत.
- गुलाबराव देवकर, परिवहन राज्यमंत्री.

कॉँग्रेसमध्ये बदल नाहीत
राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांच्या पक्षाच्या हितासाठी काही निर्णय घेतले असतील. तो त्यांच्या बदलाचा अंतर्गत प्रश्न आहे. कॉँग्रेसमध्ये बदलाचे कोणतेही संकेत नाहीत.
- माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष, कॉँग्रेस

भ्रष्ट मंत्र्यांना मिळणार डच्चू !
15 वर्षे कॅबिनेट मंत्री असलेल्यांना वेगळ्या जबाबदार्‍या देण्याचे मनात होते त्यामुळेच पवारांनी हे फेरबदल केल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मध्यंतरी काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अकार्यक्षम मंत्र्यांमुळे नाराजी आहे. अशा मंत्र्यांना डच्च् देऊन चांगली प्रतिमा असलेल्या मंत्र्यांना कायम ठेवले जाऊ शकते.

पाऊसपाणी ते राजीनामा !
पवारांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी राष्ट्रवादी मंत्र्यांची बैठक झाली. सुरुवातीला पाऊसपाण्याची चर्चा होऊन नंतर अचानक एक कागद देऊन सर्वांना सह्या करण्यास सांगितले. ते राजीनामापत्र होते. यावरून पक्षसंघटना तसेच मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होतील हे बैठकीत स्पष्ट झाले.

नव्या चेहर्‍यांना संधी
पवारांनी काही मंत्र्यांना लोकसभेसाठी तयार राहण्यास सांगितले होते. त्यातील काहींना नंतर लोकसभा लढवण्यासाठी विचारले जाऊ शकते. तसेच आमदार म्हणून नवीन चेहर्‍यांनाही संधी दिली जाईल. प्रदेशाध्यक्षपदीही तरुण चेहर्‍याला संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

यांना नारळ ?
रामराजे निंबाळकर जलसंपदा मंत्री, अनिल देशमुख अन्न व नागरी पुरवठा मंत्री, मनोहर नाईक अन्न व प्रशासन मंत्री, भास्कर जाधव नगरविकास राज्यमंत्री, गुलाबराव देवकर परिवहन राज्यमंत्री

आधीच माहिती दिली होती
मुंबई- ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले असले तरी याची माहिती पवारांनी आधीच दिली होती,’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पवारांनी आपल्याला सांगितल्यानंतर काँग्रेसचा अद्याप निर्णय झालेला नाही, असेही आपण त्यांना सांगितले होते. मंत्रिमंडळात बदल करायचे असतील तर कशा पद्धतीने करायचे, कोणता फॉर्म्युला वापरायचा यावर विचार केला नसल्याचे ते म्हणाले.

साहेबांच्या आदेशाचे पालन
''आम्ही पक्षाचे सच्चे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे पवार साहेबांच्या आदेशानुसार आम्ही राजीनामे दिले आहेत. यात विशेष काही नाही, पक्षातील रुटीन विषय आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेतले जाऊ शकतात. साहेब प्रत्येक निर्णय दूरदृष्टीनेच घेतात. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत ते कॉँग्रेसशीही चर्चा करतील.’’
- राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री