आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Publish In Rashtrawadi Magazine To Support BJP

सत्तेसाठी जवळीक: गुंतले हृदय हे कमळपाशी, राष्ट्रवादी काँग्रेसची कबुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपशी वैचारिक मतभेद असल्याचे एकीकडे सांगायचे, मात्र सत्तेचा फायदा डोळ्यासमोर ठेवून त्यांना पाठिंबाही द्यायचा, अशी दोन्ही डगरीवर पाय ठेवण्याची कसरत करणाऱ्या ‘सत्तातुर’ राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे स्वरूप आता उघड झाले आहे. या पक्षाचे मुखपत्र असलेल्या "राष्ट्रवादी' या मासिकातील संपादकीय लेखात ‘गुंतता हृदय हे कमळ दलापाशी...!’ अशा मथळ्यासह भूमिका मांडून भाजपशी आपल्या पक्षाचे सूत जुळल्याची जाहीर कबुलीच दिली आहे. एवढेच नव्हे तर या मासिकाच्या पहिल्या पानावर अजित पवार यांचे नरेंद्र मोदी यांच्यासह छायाचित्र प्रसिद्ध करून हृदय किती खोलवर गुंतलेय, याचा नमुनाही सादर केला आहे.

राष्ट्रवादीला सरकार पाडापाडीच्या राजकारणात अजिबात रस नाही. कोणत्याही परिस्थिती राज्य सरकार पाच वर्षे चालावे व लगेचच निवडणुकांना सामोरे जावे लागू नये म्हणून आम्ही भाजपला पाठिंबा दिला. मात्र याचा अर्थ भाजपच्या विचारधारेला पाठिंबा आहे, असा होत नाही. भाजपशी वैचारिक मतभेद कायम ठेवून आम्ही त्यांना सहकार्य केले आहे. त्याचवेळी आमच्या आदर्शवादी विचारांना तडा जातो आहे, असे वाटेल तेव्हा मात्र प्रखरपणे विरोध करू, अशी भूमिका आजवर राष्ट्रवादीने जाहीर केली आहे.

‘राष्ट्रवादी’ या मासिकात गुंतता हृदय हे "कमळ दलापाशी' या शीर्षकाचे एक संपादकीय प्रसिद्ध झाले आहे. या शीर्षकावरूनच "घड्याळा'चे मन भाजपच्या "कमळा'त गुंतल्याची कबुली देती. हे गुंतणे सध्या राजकीय स्थैर्यासाठीच आहे, अशी सारवासारवही यात करण्यात आली आहे.

काँग्रेस विरोधीपक्षही होऊ शकत नाही
‘महाराष्ट्रात भाजपला समर्थपणे विरोध करू शकेल, असा पर्याय निदान आम्हाला तरी दिसत नाही. काँग्रेस हा समर्थ पर्याय होऊ शकेल, असे वाटत नाही’, असे लेखात स्पष्ट करताना राष्ट्रवादीने एका दगडात दोन पक्षी मारण्याची कमाल करून दाखवली आहे. केंद्रात काँग्रेसची केविलवाणी अवस्था झाली तशीच ती राज्यातही करून टाकायची , असे भाजपप्रमाणे राष्ट्रवादीच्या मनात आहे आणि तेच त्यांच्या मासिकातील भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे.

आपल्या सरकारच्या अपयशाचीही कबुली
‘कमळ दलापाशी राष्ट्रवादीचे हृदय का गुंतलंय’, हे सविस्तरपणे मांडताना या ‘प्रेमा’चा राष्ट्रवादीने थेट केंद्राशी संबंध जोडला आहे. केंद्रात भाजपचे सरकार असून राज्यातही त्याच पक्षाचे सरकार आले तर केंद्रामधून विकासकामांना व अनेक विविध योजनांसाठी राज्याला पुरेसा निधी मिळू शकेल आणि दीर्घ काळापासून रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लागू शकतील. या निमित्ताने केंद्रात दहा वर्षे यूपीए तसेच राज्यात पंधरा वर्षे काँग्रेस आघाडीचे सरकार असताना हे प्रकल्प मार्गी लागू शकले नाही, अशी कबूली माराष्ट्रवादीने दिली आहे.

शरद पवारांची वाटचाल एनडीएकडे
पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी हाती झाडू घेतला. विश्वासदर्शक ठरावावेळी फडणवीस सरकारला दिलेला पाठिंबा, हाती घेतलेला झाडू आणि पक्षाची अधिकृत भूमिका या साऱ्या गोष्टी म्हणजे पवारांची एनडीएकडे वाटचाल सुरू असल्याचे संकेत आहेत. सत्तेविना राहू न शकणाऱ्या पवारांचीही ही शरदचंद्र कसरत असल्याचे मत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले.

... म्हणे सारे काही राज्याच्या विकासासाठी
‘भाजपचे सरकार बनू नये, असे ज्यांना वाटत होते त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, अशी सूचना केली होती. पण, शिवसेनेबरोबर सत्तेत बसायला काँग्रेसची तयारी नव्हती. निव्वळ शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार बनवू शकत नव्हते. त्यामुळेच दुसऱ्या पर्यायाचा म्हणजे भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका स्वीकारावी लागली. हे केवळ राज्याच्या विकासासाठी व सरकारच्या स्थैर्यासाठी', अशी मखलाशी करण्यास राष्ट्रवादी मागे राहिलेली नाही.