आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Releases First Candidate List For Lok Sabha Polls

तयारी निवडणुकीची : दिवस उमेदवारी याद्यांचा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता असताना गुरुवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसने 18 उमेदवारांची पहिली, तर आम आदमी पक्षाने 10 जणांची दुसरी यादी जाहीर केली.

अमरावती, बुलडाणा व शिरूर या तीन मतदारसंघांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे उमेदवार दिले आहेत. अमरावतीमधून संभाव्य उमेदवारांच्या यादीत दिनेश बूम यांचे नाव होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये चक्रे फिरली आणि नवनीत यांची लॉटरी लागली. मूळच्या पंजाबी असलेल्या नवनीत राणा कुंडलेस यांनी ठाणे जिल्ह्यातील एका गावाचे रहिवासी असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवून जातीचे खोटे प्रमाणपत्र मिळवले, असा आरोप या मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या सर्मथकांनी केला होता. स्थानिक नेत्यांचाही त्यांच्या नावाला विरोध होता. स्थानिक आणि मराठी उमेदवार असताना पंजाबी असलेल्या राणा यांची निवड अर्थपूर्ण व्यवहारातून झाल्याची शंका आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

बुलडाण्यातून इंगळे : बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र, या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे मराठा असल्याने आणि शिंगणे यांना उभे केल्यास मराठा समाज हा जाधव यांना पसंती देतो, हे लक्षात आल्याने राष्ट्रवादीने ऐनवेळी माळी समाजाच्या कृष्णराव इंगळेंना पसंती दिली. शिरूरमधून देवदत्त निकम अशा कोर्‍या पाटीच्या उमेदवाराला संधी मिळाली. शिवसेनेचे खासदार आढळराव यांची मक्तेदारी असलेल्या साखर कारखान्यावर वर्चस्व मिळवत निकम यांनी आपली सहकार तसेच आर्थिक ताकद दाखवून दिली होती.

दिंडोरीतूनही राष्ट्रवादीने ए. टी. पवार यांच्याऐवजी त्यांची मुलगी भारती पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. जयo्री या नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत.

छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, संजीव नाईक, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, प्रफुल्ल पटेल, संजय पाटील, सतीश पाटील, धनंजय उर्फ मुन्ना महाडिक, उदयनराजे भोसले, आनंद परांजपे, विजय भांबळे, राजीव राजळे या पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेल्या उमेदवारांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. हे सर्व उमेदवार जिंकून येण्याचे निकष पार करतात, असा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

नवनीत राणांसाठी अमरावतीत फील्डिंग
नवनीत राणा संभाव्य उमेदवारांमध्ये आसपासही नव्हत्या. मात्र, अंतिम यादीत नाव आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवनीत यांचे पती रवी राणांचे एका मराठी टीव्ही चॅनलचे मालक असलेल्या बिल्डरशी असलेले संबंध याकामी आल्याची चर्चा राजकीय वतरुळात आहे. या बिल्डरचे थेट प्रफुल्ल पटेल यांच्याशी कनेक्शन असल्याने नवनीत यांची उमेदवारी पक्की झाली. अमरावती मतदारसंघात गेलेले राष्ट्रवादीचे निरीक्षकही पहिल्या दौर्‍यातच नवनीत यांची उमेदवारी नक्की करून ‘समाधाना’ने परतले होते, असे म्हणतात.

आम आदमी पक्षाने गुरुवारी देशातील 30 व राज्यातील दहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात मराठी अभिनेता नंदू माधव, सुभाष लोमटे, वामनराव चटप यांचा समावेश आहे. नंदू माधव हे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात बीडमधून लढणार आहेत. ‘आप’च्या केंद्रीय समितीने गुरुवारी 30 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये दिल्ली 1, उत्तराखंड 1, गुजरात 1, हरियाणा 5, जम्मू -कश्मीर 1, हिमाचल प्रदेश 1, मध्य प्रदेश 6, पंजाब 1, राजस्थान 3 आणि महाराष्ट्रातील 10 उमेदवारांचा समावेश आहे.

दुसरी यादी
औरंगाबाद - सुभाष लोमटे, ठाणे- संजीव साने, बीड- नंदू माधव, जालना- दिलीप मस्के, भंडारा- गोंदिया- प्रशांत मिर्शा, सोलापूर- ललित बाबर, चंद्रपूर- वामनराव चटप, अमरावती- भावना वासनिक, सांगली- समीना खान, मावळ- मारुती भापकर.