मुंबई - ‘मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हटाव’साठी युद्धपातळीवर मोहीम सुरू करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे दबावतंत्र मात्र या वेळी निष्प्रभ ठरले आहे. पवारांचे हितसंबंध असलेल्या अनेक प्रकल्पांच्या फायली चव्हाण मंजूर करत नसल्यानेच त्यांनी हा खटाटोप केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत सपाटून मार खाल्ल्याने व केंद्रातील सत्ता गमावल्यापासून पवार प्रचंड अस्वस्थ आहेत. आता विधानसभेतही सत्ता जाण्याच्या भीतीने त्यांच्या अस्वस्थतेत आणखी भर पडली आहे. यामुळेच पवारांनी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून ‘मुख्यमंत्री हटाव’ मोहिमेला बळ दिले होते. असे केले तरच राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार येऊ शकते, असे वातावरण तयार करण्यातही काही अंशी ते यशस्वी झाले होते. मात्र कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील विश्वास या परिस्थितीतही कायम ठेवत पवारांचे दबावअस्त्र निकामी केल्याची चर्चा आहे. केंद्रात पाच वर्षे सत्ता मिळणार नाही, राज्यात तसे झाले तर करायचे काय, यामुळे पवारांनी पृथ्वीराजांविरोधात दिल्लीत कान फुंकायला सुरुवात केली होती. यासाठी त्यांनीच पृथ्वीराजांना पर्याय म्हणून सुशीलकुमार शिंदे यांचेही नाव पुढे आणले. शिंदे यांच्या हाती सूत्रे दिल्यास राष्ट्रवादीला सोयीचे ठरेल. त्यांच्या साथीने राज्यात पुन्हा आघाडीची सत्ता आणू, असा शब्द पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला होता. शब्द देण्यामागे पवारांची मोठी राजकीय खेळी असल्याची माहिती दिल्लीत गेलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. आचारसंहिता लागण्यापूर्वीच हितसंबंधाच्या फायली मंजूर करण्याचाही त्यांचा डाव असल्याचे सांगितले जाते.
पुढील स्लाइडमध्ये, काय होती पवारांची खेळी ?