आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Sideline To Ganesh Naik After His Affection With Bjp

गणेश नाईकांना राष्ट्रवादीकडून डच्चू; वाचा, नव्या पदाधिका-यांची यादी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपल्या जिल्हा संपर्कप्रमुखांची यादी जाहीर केली आहे. यात सर्व नेत्यांना अपेक्षित संधी देण्यात आली आहे. मात्र, नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे कोणतेही जबाबदारी सोपविण्यात आली नाही. गणेश नाईक भाजपच्या वाटेवर असल्यानेच त्यांना राष्ट्रवादीने डच्चू दिल्याचे मानले जात आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते यांच्याशी संपर्क साधला असता, सक्रीय नेत्यांनाच पक्षाने जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी दिल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे गणेश नाईक राष्ट्रवादीत सक्रिय नाहीत व पक्षातील नेत्यांशी त्यांचा संवाद नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे जिल्ह्याची जबाबदारी याआधी गणेश नाईक यांच्याकडे होती. मात्र, आता ही जबाबदारी माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आली आहे. आव्हाड यांच्याकडे ठाणेसोबतच पालघर या नव्या जिल्ह्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, गणेश नाईक यांना पक्षाने डच्चू देऊन भाजपमध्ये जाण्यास प्रवृत्तच केल्याचे मानले जात आहे. शरद पवार कोणत्याही नेत्यांपुढे गुडघे टेकत नाहीत हे आजच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. मार्च महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार या प्रमुख नेत्यांना संबधीत जिल्हयाचे प्रभारी/ संपर्कप्रमुख पद सोपविण्यात आले आहे. पक्षाचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्याकडे पुणे आणि महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक, मधुकरराव पिचड यांच्याकडे अहमदनगर, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अमरावती व जळगाव, जयंत पाटीलांकडे मुंबई व नांदेड, जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे बीड व लातूर, हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूर व बुलढाणा, शशिकांत शिंदे यांच्याकडे सांगली व सातारा, दिलीप सोपल यांच्याकडे उस्मानाबाद व सोलापूर, भास्कर जाधव यांच्याकडे रत्नागिरी व सिंधुदुर्ग, मनोहर नाईक यांच्याकडे यवतमाळ व वाशिम, राजेश टोपेंकडे जालना व औरंगाबाद, जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ठाणे व पालघर, धनंजय मुंडेंकडे नागपूर व वर्धा, अनिल देशमुख यांच्याकडे भंडारा व गोंदिया, सचिन अहिर यांच्याकडे रायगड, सुरेश धस यांच्याकडे परभणी व हिंगोली, राजेंद्र शिंगणेंकडे अकोला, सतिश पाटील यांच्याकडे नंदूरबार व धुळे आणि रमेशचंद्र बंग यांच्याकडे चंद्रपर व गडचिरोली अशी जिल्हानिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
वाचा, नव्या पदाधिका-यांची यादी...