आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Spokeperson Nawab Malik Answerd To Shivsena & Uddhav Thackeray

शरद पवार गद्दारांचे नेते -उद्धव; शिवसेना मुर्दाड लोकांचा पक्ष - राष्ट्रवादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना हा मुर्दाडांचा पक्ष आहे व उद्धव ठाकरे हे मुर्दाडांचे नेते आहेत, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. रविवारी रात्री डोंबिवलीत झालेल्या महायुतीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला गद्दारांचा पक्ष व शरद पवार हे गद्दारांचे नेते असल्याची टीका केली होती.
डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानावर शिवसेना-भाजप-आरपीआय-स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीची महासभा झाली. त्या सभेत गोपीनाथ मुंडे यांच्यासह उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नितींवर व शरद पवारांवर सडकून टीका केली होती. त्याला नवाब मलिक यांनी उत्तर दिले. शिवसेनेचे दोन खासदार राष्ट्रवादीने पळविल्याने या सभेत सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतले. मुंडे, आठवले यांनी याचा आपल्या भाषणात उल्लेख केल्यानंतरही उद्धव म्हणाले होते की, रामदासजी, मुंडेंजी तुम्ही गद्दाराबाबत बोलला आहातच. पण गद्दार शोधणार तरी कुठे? अडगळीत पडलेले लोकच चढ्या भावाने विकत घेण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी म्हणजे गद्दार पार्टी. त्यांचा नेताच खंजीर खुपसणारा असेल तर त्यांचे सहकारीही गद्दारच आहेत, अशी जहरी टीका राष्ट्रवादीवर व शरद पवारांवर केली होती. त्याला नवाब मलिक यांनी आज उत्तर दिले आहे.
दरम्यान, मलिक यांची लायकी काय आहे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन नेते मोठे आहेत. मलिकांनी यात लूडबूड करू नये. आगामी काळात शिवसेना पक्ष मुर्दाडांचा पक्ष आहे की ताकदवानांचा आहे ते त्यांना दाखवून देऊ. मलिक यांना पक्षातून बाजूला फेकले आहे. येत्या काळात मंत्रिपद मिळविण्यासाठी त्यांनी सध्या चमकोगिरी सुरू केली आहे. पण त्यांची लायकी त्यांना दाखवून देऊ, असे सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.