आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा फार्स : ‌‌उमेदवार ठरल्यानंतर मुलाखती!, इच्छुकांनी व्यक्त केली नाराजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मात्र, उमेदवारांची यादी आधीच ठरवून नंतर पक्षनेत्यांनी मुलाखतीचा फार्स पार पाडला, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत काही इच्छुकांनी पक्षाच्या या कारभाराबाबत नाराजीही व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आदिवासी मंत्री मधुकर िपचड, पालकमंत्री व संपर्कमंत्र्यांनी नरीमन पॉइंट येथील राष्ट्रवादी भवनात या मुलाखती घेतल्या.
मुंबई शहर व उपनगर ३६, ठाणे शहर व ग्रामीण १८, पालघर ६, रायगड ७, रत्नागिरी ५, सिंधुदुर्ग ३ अशा जागांसाठी मुलाखती झाल्या. एका जागेसाठी किमान ३, तर कमाल १० जण मुलाखती झाल्या.
एका इच्छुक उमदेवाराची सुमारे तीन मिनिटे मुलाखत झाली. मुलाखतीत त्याचे नाव, काम, राजकीय अनुभव व सामाजिक बांधलकीविषयी प्रश्न विचारण्यात आले. ब-याच उमेदवारांनी मुलाखत घेणा-याला प्रश्न विचारण्याची फारशी संधी न देता तीन मिनिटांत अपेक्षित माहिती दिली. बहुसंख्य उमदेवारांनी आपली माहिती देतानाच काँग्रेससोबत आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा आग्रह धरला. तर काहींनी आघाडी होत असेल तर किमान निम्म्या १४४ जागा पदरात पाडून घ्याव्यात, असेही सुचवले.
मंत्री ठरले ‘बिनविरोध’
सचिन अहिर, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, भास्कर जाधव, उदय सामंत हे मुंबई, ठाणे, रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे मंत्री असून त्यांच्या मतदारसंघातून जागा मिळणे अशक्य असल्याने कोणी अर्जच भरला नव्हता. विशेष म्हणजे इच्छुक उमदेवार म्हणून या उमेदवारांच्या मुलाखतीही झाल्या नाहीत. त्यांच्या उमदेवारीवर परस्पर शिक्कामोर्तब झाले. याला अपवाद ठरला तो तटकरेंचा रोहा मतदारसंघ.
तटकरेंची मुलगी रोह्यातून
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रोहा मतदारसंघामधून त्यांची मुलगी अदिती ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. अदिती राष्ट्रवादीच्या युवती विभागाची कोकण संघटक आहे. तटकरे विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर रोह्यात विधानसभेसाठी त्यांचे चिरंजीव अनिकेत यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र शरद पवार यांनी अदितीच्या नावाचा आग्रह धरल्याने अनिकेतचे नाव मागे पडले.
सर्वच जागांसाठी मुलाखती
राष्ट्रवादीने विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघाच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटपात निम्म्या किंवा त्यापेक्षा थोड्या कमी जागा मिळाल्या तरी पक्षातील वातावरण जिवंत राहावे, यासाठी सर्वच्या सर्व मतदारसंघासाठी मुलाखती घेण्याचे ठरवले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
आज मराठवाडा, विदर्भातील मुलाखती
मंगळवारी मराठवाडा, विदर्भातील उमदेवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. तर बुधवारी उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रासाठी मुलाखती होणार आहेत. काँग्रेसच्या तुलनेत येथे ताकद कमी असल्याने तगडे उमदेवार देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे, असे राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा हक्क आहे. त्यामुळे आम्ही सर्व २८८ जागांसाठी मुलाखती घेतल्याचेही ते म्हणाले.