आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- राज्यामध्ये 2014 मध्ये होणा-या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा पक्षाच्या सर्व मंत्र्यांची एक बैठक मुंबईत झाली. या बैठकीमध्ये ‘मिशन 2014’विषयी जिल्हानिहाय चर्चा करण्यात आली.
अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह राष्ट्रवादीचे बहुतेक मंत्री उपस्थित होते. प्रत्येक मंत्र्याने या वेळी आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पक्षाच्या कामाची माहिती दिली. तसेच संघटना वाढवण्यासाठी येणा-या अडचणीही सांगितल्या. राष्ट्रवादीच्याच नेत्यांमध्ये असलेले पक्षांतर्गत वादविवाद मिटवण्याच्या सूचना पिचड यांनी दिल्या. काही मतदारसंघांतून आमदारकीसाठी उत्सुक असलेल्या काही उमेदवारांच्या नावांची चर्चाही या वेळी झाल्याचे एका मंत्र्याने सांगितले.
जिल्हास्तरीय विविध समित्या कार्यरत आहेत का, याचाही आढावा घेण्यात आला. समित्यांवर नियुक्त्या झाल्या नसतील तर त्याही लवकरात लवकर कराव्यात, असे अजित पवार यांनी सांगितल्याचे समजते.
पवार घेणार आढावा
उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी या वेळी एक सादरीकरण करून पक्षाची जिल्हानिहाय स्थिती बैठकीमध्ये मांडली. त्यावर प्रत्येकाने आपले मत नोंदवले आणि पुढच्या दोन वर्षांमध्ये काय केले जाऊ शकते याबाबत सर्वांनी सूचना केल्याचे समजते. या बैठकीचा आढावा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होणा-या बैठकीमध्ये दिला जाईल.
पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे प्रश्न सोडवावेत
ग्रामीण स्तरावरील अनेक लहानसहान प्रश्नांसाठी राज्याच्या कानाकोप-यातील जनता मुंबई आणि मंत्रालयात धाव घेते. त्यामुळे त्यांचे प्रश्न जिल्हास्तरावर सोडवले जावेत यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी खबरदारी घ्यावी, असे परिपत्रकच पक्षाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार दर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जनता दरबार घेतात. या दरबारात राज्यातील कानाकोप-यातून लोक अत्यंत छोटे प्रश्न घेऊन येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक स्थानिक पातळीवर होणे शक्य असतानाही या जनतेला मुंबई आणि मंत्रालयापर्यंत यावे लागणे लाजिरवाणे आहे. त्यांच्या छोट्या समस्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांचा वेळ आणि त्या मंडळींचा वेळ आणि पैसेही खर्ची पडतात. त्यामुळे अजित पवार यांनी याची गंभीर दखल घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी पक्षाच्या सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या
जिल्ह्यातील लोकांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवल्या जातील याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात पक्षाचे एक परिपत्रक काढून सक्त ताकीदही दिली आहे. यामुळे छोट्या तक्रारींसाठी मुंबईपर्यंत येणा-या लोकांचा त्रास कमी होईल. उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांना महत्त्वाच्या धोरणात्मक बाबींवर चर्चा करून निर्णय घ्यायला वेळ मिळेल, असे पवारांनी या परिपत्रकात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
समाजासाठी सत्तेचा मोह ठेवू नये : पवार
उजवीकडची सोंगटी घेण्यासाठी पवार डावीकडे स्ट्रायकर मारतातः राज ठाकरे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.