आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Warns Congress, Give Decision In 48 Hours Otherwise We Will Go Own Way

काँग्रेसने 2 दिवसांत निर्णय घ्यावा अन्यथा स्वबळावर लढण्याची घोषणा करू- राष्ट्रवादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ कोल्हापूर- उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ चार दिवस बाकी आहेत, असे असतानाही काँग्रेसकडून जागावाटपाबाबत अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांच्या प्रतिसादाची आम्ही खूप वाट पाहिली पण त्यांच्याकडून तसे काही झाल्याचे दिसत नाही. आता आमचा संयम सुटत चाललेला आहे. काँग्रेसने आघाडीबाबत 2 दिवसांत आम्हाला निर्णय कळवावा अन्यथा त्यानंतर आम्ही स्वबळावर लढण्याची घोषणा करू असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला आजपासून कोल्हापूरातून सुरुवात होत आहे. त्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते कोल्हापूरात दाखल झाले आहेत. यावेळी तटकरे बोलत होते. प्रचाराला सुरुवात झाली पण अजून जागावाटप झाले नाही. आघाडी होणार आहे की नाही याची माहिती राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वालाच नाही अशा परिस्थितीत प्रचाराची दिशा काय असेल असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष तटकरेंना पत्रकारांनी विचारला असता त्यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला.
तटकरे म्हणाले, निवडणुकीसाठी खूपच कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराला सुरुवात करावी लागत आहे. चार दिवसांनी म्हणजेच 20 तारखेनंतर उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरूवात करतील. अशा परिस्थितीत सर्व जनतेसमोर पक्षाचे धोरण घेऊन गेले पाहिजे. मात्र, काँग्रेसला आम्ही खूप दिवसापूर्वीच जागावाटपाचा प्रश्न सोडवावा असे सांगितले आहे. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही खूप वाट पाहिली आता संयम सुटत चालला आहे. काँग्रेसने 2 दिवसांत आघाडीबाबत निर्णय कळविला नाही तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा करू असे तटकरेंनी सांगितले.
राष्ट्रवादीने काँग्रेसकडे 144 जागांची मागणी केली आहे. मात्र त्यात मागे-पुढे होऊ असे सांगत तडजोडीचे संकेत दिले आहेत. मात्र काँग्रेसकडून थंड प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेसला राष्ट्रवादीला 125 जागा देऊ इच्छित आहे. त्यापेक्षा जास्त जागांची मागणी असल्यास काँग्रेसने स्वबळावर लढावे असा पक्षातील नेत्यांचा सूर आहे. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जावे या मतांचे आहेत. त्यामुळे काँग्रेसने छाननी समितीची मंगळवार सकाळपर्यंत चार बैठक झाल्या आहेत. सोमवारी रात्री उशिरापर्यंत मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत काही मतदारसंघांची अदलाबदल आणि कॉँग्रेसच्या उमेदवारांची नावे अंतिम करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रभारी आणि कॉँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नारायण राणे उपस्थित होते. राज्यात विधानसभेच्या काही मतदारसंघांत उमेदवारीबाबत वाद सुरू आहेत. त्याचा निवाडा कसा करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी कॉँग्रेसने काही मतदारसंघ बदलून मागितले आहेत त्याबाबत या नेत्यांनी विचारविमर्श केला. काही विद्यमान उमेदवारांना बदलण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, राष्ट्रवादीला किती जागा सोडायच्या याबाबत अद्याप एकमत झालेले दिसून येत नाही. दरम्यान, काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीला 128 पर्यंत जागा सोडू शकतो असे सांगितले जात आहे.