आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणाला दहशतवाद नव्हे विकास हवा आहे- केसरकर, उद्धव यांच्या उपस्थितीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: दीपक केसरकर)
सावंतवाडी- नारायण राणे यांच्या विरोधात उघड बंड पुकारलेल्या व त्यासाठी आपल्या पक्षासह आमदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडलेले दीपक केसरकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सावंतवाडी येथील डॉ. स्वार दवाखान्यासमोरील जिमखाना मैदानावर हा समारंभ पार पडला. उद्धव ठाकरे सकाळी 11 वाजताच सिंधूदुर्गात पोहचले होते. आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीतील असंख्य पदाधिकारी व पाच हजार कार्यकर्ते यांच्यासमवेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना केसरकर म्हणाले, कोकणच्या जनतेला विकास हवा आहे, दहशतवाद नको आहे. तसेच या दहशतवादाविरोधात मी उभा राहिलो नाही तर येथील जनता उभी राहिली. मला तुम्ही राणेंचे नाव घेऊ नका असे सांगितले पण या प्रवृत्तीचे नाव घ्यावे लागतेय. या माणसाने सामान्य माणसांच्या जमिनी घशात घातल्या. सरकारच्या माध्यमातून आरक्षण टाकले. त्यामुळे लोकांनी कमी किमतीत देऊन टाकल्या व त्यांनी आरक्षण काढून कोट्यावधी रूपयांची माया जमविली. राणेंना कोकणी जनतेचे बिलकूल प्रेम नाही. ते राजीनाम्याचे नाटक करीत आहेत. राणेंचे काँग्रेसमधील बंड हे आपल्या मुलांचे पुर्नवसन करण्यासाठी व महसूलसारखे खाते मिळविण्यासाठी आहे, असेही गौप्यस्फोटही केसरकर यांनी केला.
केसरकर यांच्यासोबतच माजी आमदार शंकर कांबळी, दोडामार्गाचे सुरेश दळवी, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मयेकर, (ज्यांची राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारीच पक्षातून हकालपट्टी केली) शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, वेंगुर्ले येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आदी नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडीमुळे कोकणात सेनेची ताकद दुपटीने वाढली असून, त्यामुळे राणेंसह राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, इकडे मुंबईत नारायण राणे आपल्या नाराजीनाम्याचा शेवटचा अंक सादर करण्याच्या तयारीत आहेत.