आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला \'दे धक्का\', NDTV च्या सर्वेत अवघ्या 9 जागा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशात एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल व नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील असा अंदाज एनडीटीव्हीने केलेल्या सर्वेत व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीचा धुव्वा उडेल व या दोन्ही पक्षांना मिळून 48 पैकी केवळ 9 जागा मिळतील असे भाकीत वर्तविले आहे. याचबरोबर शिवसेना-भाजप व मित्र पक्षांच्या महायुतीला 48 पैकी तब्बल 37 जागा मिळतील असे सर्वेत म्हटले आहे. राज ठाकरेंच्या मनसेला 1 जागा तर इतर पक्षांना 1 जागा मिळेल असे दाखविण्यात आले आहे.
याचबरोबर, महायुतीला तब्बल 43 टक्के मते मिळतील असे म्हटले आहे. 2009 साली महायुतीला सुमारे 36 टक्के मते मिळाली होती. यंदा त्यात 7 टक्के वाढ होताना तब्बल 17 जागा जास्त दाखविल्या गेल्या आहेत. 2009 साली महायुतीने 48 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या. त्यात शिवसेनेने 11 तर भाजपने 9 जागा जिंकल्या होत्या. 2009 साली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 38.5 टक्के मते मिळाली होती. यंदा त्यात 6 टक्क्यांनी घट होईल ते 33 टक्केवर येतील असे सर्वेत म्हटले आहे. यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीला केवळ 9 जागा मिळतील असे म्हटले आहे. 2009 साली काँग्रेसने 17 तर राष्ट्रवादीने 8 अशा सुमारे 25 जागा जिंकल्या होत्या.
राज ठाकरे यांच्या मनसेला यंदा 1 जागा मिळेल असे म्हटले आहे. तसेच मनसेच्या मतांत कोणतेही वाढ किंवा घट होणार नसल्याचे सर्वे सांगतो. 2009 साली मनसेला 4 टक्के मते मिळाली होती. यंदाही तेवढीच मते मिळतील असे म्हटले आहे. याशिवाय आणखी एक अपक्ष किंवा इतर छोट्या पक्षांना मिळेल असे म्हटले आहे. यात पालघरमधील बळीराम जाधव किंवा अकोल्यातील प्रकाश आंबेडकर यांच्या जागेचा समावेश आहे. एनडीटीव्हीने केलेल्या एप्रिलच्या ताज्या सर्वेत महाराष्ट्रात 48 पैकी महायुतीला सर्वाधिक 37 जागा, काँग्रेस-राष्ट्रवादीला 9, मनसे व अपक्ष प्रत्येकी 1 अशा दोन जागा दाखवल्या आहेत.
दरम्यान, वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ भाटिया यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात महायुतीला एवढे मोठे यश मिळेल असे वाटत नाही. संघटनात्मक पातळीवर काँग्रेससह राष्ट्रवादीचे मोठे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या संख्येने जागा महायुतीला शक्य होणार नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रथमच एकदिलाने लढत आहे. शरद पवारांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच ही आघाडी एकसंध झाल्याचे सांगत चव्हाणांनी याचे सारे श्रेय पवारांना दिले आहे. जातीयवादी पक्षांसह आपचे आव्हान आमच्यापुढे आहे. पण राज्यातील जनता सुज्ञ आहे व काँग्रेस-राष्ट्रवादीलाच निवडून देईल. त्यामुळे मागील वेळी 25 जागा जिंकल्या होत्या त्यापेक्षा यंदा जास्त जागा मिळतील असा विश्वास मुलाखतीत व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी यंदा किमान 12 जागा जिंकेल व 3 ते 4 जागांवर अतिशय चुरशीच्या आहेत. त्यातील काही निकाल आमच्या बाजूने येतील, असे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादी आगाडी राज्यात सुमारे 30 जागा जिंकेल असे म्हटले आहे. भाजपने आम्हाला अपेक्षित असेच आकडे असल्याचे सांगत सावध प्रतिक्रिया दिली आहे.