आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांवर दिल्ली नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेसकडे असलेल्या महामंडळांवर नियुक्त्या न केल्याने महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिल्ली येथे बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राज्यातील मंत्री आणि नेतेही या विलंबाबद्दल मुख्यमंत्र्यांना दोषी धरत आहेत. महिला आयोग, म्हाडा ही महत्त्वाची मंडळे नियुक्तीविना असल्यामुळे कार्यकर्त्यांमधील अस्वस्थताही वाढत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसमधील काही मंत्र्यांनी दिली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणे गरजेचे असताना मुख्यमंत्री निर्णयच घेत नसल्याने संघटना मजबूत करणार कशी, असा प्रश्न आता नेत्यांना पडला आहे. चव्हाण यांनी बुधवार आणि गुरुवारी दिल्लीतील सर्व वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्यामुळे राज्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मुख्यमंत्र्यांनी जाताना मंत्रिमंडळ बदलाची हवाही निर्माण केली होती. पण महामंडळांवरील नियुक्त्यांचा निर्णयही न घेतल्याने मोहन प्रकाश यांनी या वेळी राहुल गांधी यांच्यासह उपस्थित सर्व वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्याचे पडसाद राज्यातही उमटलेले दिसतात.

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राज्यातील महिला आयोगावर अध्यक्षाची नेमणूक व्हावी म्हणून जोरदार मागणी झाली. चव्हाण यांनीही लवकरच नियुक्ती करण्याचे आश्वासन माध्यमांशी बोलताना दिले. त्यासाठी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची गेल्या महिन्यात बैठक होऊन विविध नावांची चर्चाही झाली.

त्यांच्या पसंतीचा नेता निवडण्याचे स्वातंत्र्यही या वेळी मोहन प्रकाश यांनी दिल्याचे समजते. पण अद्याप त्यावर निर्णयच मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाही, अशी माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. या प्रकारामुळेच मोहन प्रकाश मुख्यमंत्र्यांवर प्रचंड नाराज झाले आहेत. तसेच वेळोवेळी प्रकाश यांच्या विरोधात बातम्या पेरणे, त्यांचे प्रभारीपद काही काळासाठीच आहे, अशा कंड्या पिकवणे यात मुख्यमंत्र्यांचे सर्मथक पुढे असल्यानेही प्रकाश व मुख्यमंत्री यांच्या संबंधात दुरावा निर्माण झाला आहे.