मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील दलित हत्याकांडाने नवे वळण घेतले आहे. मुंबई उच्च न्यायालयातील निष्णात वकिलांच्या मार्गदर्शनाखाली जातीय अत्याचारविरोधी समितीने या प्रकरणाचे पुन्हा सत्यशोधन करून नवे पुरावे गोळा केले असून त्याचा गौप्यस्फोट सोमवारी मुंबईतील जाहीर सभेमध्ये केला जाणार आहे.
२० ऑक्टोबर रोजी पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथे जाधव कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यामुळे आघाडी सरकारची मोठी बदनामी झाली होती. भाजपचे नवे सरकार आल्यानंतर गुन्हेगारांना पकडण्याची मोहीम तीव्रही झाली होती. पाच डिसेंबर रोजी पोलिसांनी हत्याकांडांचे गूढ उकलल्याचा दावा केला.
जाधव कुटुंबातील चुलत भावांनीच हे हत्याकांड घडवून आणल्याचे सांगत याप्रकरणी पोलिसांनी मृत संजय जाधवचा चुलत भाऊ व त्याच्या दोन पुतण्यांना अटक केली आहे. मात्र अटक केलेले आरोपी खरे नाहीत. पोलिसांनी दलित आंदोलने दडपण्यासाठी हे नाटक केल्याचा आरोप दलित संघटनांनी केला आहे. त्याची दखल घेत जातीय अत्याचारविरोधी संघटनांनी या हत्याकांडाचे संपूर्ण संशोधन केले. त्याचे पुरावे गोळा करून पोलिसांचा हा बनाव असल्याचा आरोप करत तो सिद्ध करण्याचे आव्हानही दलित संघटनांनी स्वीकारले आहे.
वकिलांची फौज
या प्रकरणात पोलिसांची खेळी उघडी पाडण्यासाठी उच्च न्यायालयातील मिहिर देसाई, उत्तम जहागीरदार, राजेश गायकवाड, बी. जी. बनसोड या नामवंत वकिलांची फौज उभी राहिली आहे.
‘फोन टॅप होतात’ सोनार सत्यशाेधन समिती या प्रकरणात
आपला भंडाफोड करण्याच्या प्रयत्नात असल्याची कुणकुण अहमदनगर पोलिसांना लागली आहे. त्यामुळे आमचे फोनसुद्धा टॅप होत आहेत, असा आरोप दलित अत्याचारविरोधी कृती समितीचे श्याम सोनार यांनी केला आहे.
दाभोलकर होणार नाही
आघाडी सरकारच्या काळात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. या प्रकरणातील आरोपींचा अद्याप शोध लागला नाही; परंतु जवखेडे हत्याकांडाचे असे होऊ देणार नाही. यातील परिस्थितीजन्य पुरावे आमच्या हाती आले असून पोलिस उघडे पडतील.
सुधीर ढवळे, विद्रोही मासिकाचे संपादक