आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींसाठी राज्यात 14 नवीन वसतिगृहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उच्च शिक्षण घेण्याची मुलींची इच्छा असूनही वसतिगृहे नसल्याने त्यांना शिक्षण घेता येत नाही. त्यांचे पालकही वसतिगृहाची व्यवस्था नसल्याने मुलींना परगावी पाठवण्यास तयार नसतात. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नऊ नवीन वसतिगृहांसह पाच वसतिगृहांचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. यामध्ये औरंगाबाद, सोलापूर, जालना, जळगावची निवड करण्यात आली आहे.

राज्यात नव्याने उभारण्यात येणार्‍या नऊ वसतिगृहांच्या माध्यमातून एकूण 1770 व पाच विस्तारित वसतिगृहांच्या माध्यमातून 480 अशा एकूण 2250 प्रवेशक्षमता निर्माण करण्यास विभागाने मंजुरी दिल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सूत्रांनी दै. ‘दिव्य मराठी’ला दिली.

नव्या वसतिगृहाच्या योजनेअंतर्गत औरंगाबाद येथील अध्यापक महाविद्यालयांत 200 प्रवेशक्षमतेचे वसतिगृह उभारण्यात येणार असून ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील वसतिगृहाच्या विस्तारीकरणासह 5.82 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

जळगाव शासकीय तंत्रनिकेतन येथे 100 प्रवेशक्षमतेच्या वसतिगृहासाठी 3.5 कोटी रुपये, सोलापूर महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे 100 प्रवेशक्षमतेच्या वसतीगृहासाठी 4 कोटी रुपये, नांदेड विद्यापीठ परिसरात 100 प्रवेशक्षमतेच्या वसतीगृहासाठी 3 कोटी रुपये तर जालना येथे मुलींचे नवीन येथे 100 प्रवेशक्षमतेच्या वसतीगृहासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

कंत्राटी पद्धतीने पदे भरणार
नव्या नऊ वसतिगृहांमध्ये काम करण्यासाठी एकूण 171 नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. यामध्ये नऊ अधीक्षक, नऊ सहायक अधीक्षकांचा समावेश आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वसतिगृहावर चार पहारेकरी नेमण्यात येणार असून कनिष्ठ लिपिक, पहारेकरी, शिपाई आदी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

या वसतिगृहात उच्च शिक्षणाच्या शासकीय संस्थांमधील विद्यार्थिंनींसह खासगी अनुदानित संस्थामधील विद्यार्थिंनींनाही प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहात प्रवेश देण्याबाबतची नियमावली तयार करण्याचे काम संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्याकडे सोपवण्यात आली असून येत्या जुलै महिन्यापर्यंत ही नियमावली तयार होणार आहे.

अंदाजपत्रक तयार
मुंबई, नागपूर, औरंगाबाद व पनवेल येथील उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी या नव्या वसतिगृहांबाबत आराखडा व अंदाजपत्रक तयार केले असून शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. तसेच नवीन वसतिगृहासाठी आवश्यक जागा संबंधित यंत्रणांकडून उपलब्ध करून घेण्याची कार्यवाहीही तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आले आहेत. पुढील वर्षापासून वसतिगृहाच्या बांधकामाचे काम सुरू होईल व त्याचा राज्यभरातील विद्यार्थिनींना लाभ घेता येईल, असेही सरकारने स्पष्ट केले.