आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फी पाॅइंटसाठी रंगले राजकारण; शिवाजी पार्कवर पाेलिस बंदाेबस्त तैनात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  मुंबईतील तरुणाईचे आकर्षण ठरलेला शिवाजी पार्क येथील सेल्फी पॉइंटवर बंद करण्याचा निर्णय मनसेने घेतल्यानंतर  त्यावर कब्जा करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने पावले टाकायला सुरुवात केली आहेत. मात्र, खर्च परवडत नसल्याने हा सेल्फी पाॅइंट बंद करत आहोत, असे अगोदर सांगणाऱ्या मनसेने पुन्हा एकदा हा सेल्फी पॉइंट सुरू करण्याचा नाट्यमय निर्णय घेत शिवसेना आणि भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. या सर्व घडामोडी पाहता भविष्यात हा सेल्फी पॉइंट शिवसेना, मनसे आणि भाजपमधील “बॅटल पॉइंट’ ठरण्याची शक्यता आहे.   
 
मनसेचे दादरमधील मावळते  नगरसेवक संदीप देशपांडे यांनी दादरच्या शिवाजी पार्क येथे एक सेल्फी पाॅइंट उभारला होता. रंगीबेरंगी छत्र्यांच्या आधारे उभारलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सेल्फी काढून केले हाेते. हा सेल्फी पॉइंट मुंबईतील तरुणाईच्या आकर्षणाचे केंद्र ठरला होता. या उपक्रमाचा खर्च काही खासगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून भागवला जात होता. 
 
मात्र, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे पराभूत झाल्यानंतर सेल्फी पॉइंटचा खर्च भागवणे शक्य नसल्याचे सांगत देशपांडे यांनी हा सेल्फी पॉइंट बंद करण्याचा निर्णय घेतला. ही संधी हेरत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महापालिकेकडून हा सेल्फी पॉइंट परत सुरू करण्याची परवानगी मिळवली.
 
शिवसेनेला या बातमीचा सुगावा लागताच या प्रभागातून नव्याने निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनीही मग या सेल्फी पॉइंटचा खर्च शिवसेनेद्वारे भागवला जाईल, अशा आशयाचे बॅनर्स शिवाजी पार्क परिसरात लावले. या सगळ्या घडामोडी घडत असताना मग मनसेनेही पुन्हा उचल खाल्ली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आम्ही हा सेल्फी पॉइंट पुन्हा सुरू करत असल्याचे सांगत मनसेने पुन्हा एकदा या सेल्फी पॉइंटवर दावा सांगितला आहे. तशा आशयाचे पोस्टर्सही मनसेने शिवसेनेच्या बॅनर्सशेजारी लावले आहेत.  

शिवाजी पार्कवर पाेलिस बंदाेबस्त तैनात  
शिवसेना, भाजप व मनसेतील राजकीय द्वंद्व पेटलेले असताना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक पोलिसही सतर्क झाले अाहेत. शिवाजी पार्क पोलिस ठाण्याने या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, ‘सेल्फी पॉइंटची संकल्पना ही आमचीच असून आम्हीच तो पुन्हा सुरू करणार,’ असा दावा मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी दिव्य मराठीशी बोलताना केला आहे. त्यामुळे आगामी काळात या सेल्फी पॉइंटवरून या तिन्ही पक्षांमध्ये मोठे राजकीय वॉर रंगण्याची चिन्हे आहेत. 
बातम्या आणखी आहेत...