आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Student Discipline Bill In Maharashtra Vidhansbha

विद्यार्थ्याने शिस्तभंग केल्यास पाच वर्षे परीक्षाबंदीची कारवाई!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जेएनयूमध्ये घडलेल्या प्रकारानंतर राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याची तरतूद महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक २०१६ मध्ये करण्यात आली आहे. या नव्या तरतुदीनंतर कुलगुरु विद्यार्थ्यांना पाच वर्षांपर्यंत परीक्षाबंदी करू शकणार आहेत. विधानसभेत मांडलेल्या या विधेयकावर सोमवारी विधानसभेत चर्चा केली जाणार आहे.
विधेयकाच्या नावनोंदणी, पदव्या दीक्षांत समारोह या अकराव्या प्रकरणात कुलगुरूंना अधिकार देण्यात आलेले आहेत. विधेयकात नमूद केल्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने वा विद्यार्थ्यांनी शिस्तभंग केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करीत कुलगुरू त्यांची हकालपट्टी करू शकतात वा ठराविक मुदतीसाठी त्याला किंवा त्यांना काढून टाकू शकणार आहेत. एवढेच नव्हे तर महाविद्यालयात, परिसंस्थेत वा विद्यापीठाच्या विभागातील एक किंवा अनेक पाठ्यक्रमासाठी विनिर्दिष्ट मुदतीकरिता प्रवेश देण्याची आणि दंडाची कारवाईही कुलगुरू करू शकणार आहेत. विभाग, संचलित महाविद्यालय किंवा विद्यापीठाकडून चालवण्यात येणाऱ्या परिसंस्थेच्या परीक्षेसही या विद्यार्थ्यांना पाच वर्षांहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी बसू दिले जाणार नाही. एवढेच नव्हे तर असे विद्यार्थी परीक्षेस बसले असतील तर त्यांचा निकाल रद्द करण्याचे अधिकारही कुलगुरूंना देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी काढून टाकण्यात आले असेल तर त्याला बाजू मांडू देण्याची संधीही या विधेयकात देण्यात आलेली आहे.

विधेयकात नमूद केल्याप्रमाणे, कुलगुरूंच्या अधिकारांना कोणत्याही प्रकारे बाधा येऊ देता, संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठाच्या परिसंस्थांचे प्रमुख आणि विद्यापीठ विभाग प्रमुख यांना त्यांच्या प्रभाराखालील विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य ती शिस्त राखण्यासाठी आवश्यक असतील अशा सर्व अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.
नियमांची माहिती पुस्तकेत नमूद; विद्यार्थ्यांनाही प्रत मिळणार
नव्या कायद्यतील या सर्व नियमांची माहिती विद्यापीठ, संलग्न महाविद्यालये आणि परिसंस्थांच्या माहिती पुस्तिकेत नमूद करण्यात येणार असून याची एक प्रत प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य आणि परिसंस्थांचे प्रमुख यांना या नियमांव्यतिरिक्त शिस्तभंगाची अतिरिक्त मानके तयार करण्याचे अधिकार देण्यात आले असून या मानकांची एक प्रतही विद्यार्थ्यांना द्यावी असेही या विधेयकात नमूद करण्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर या सर्व नियमांचे पालन करण्याबाबत विद्यार्थ्याला प्रतिज्ञापत्रही द्यावे लागणार आहे.