आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Toll Policy News In Marathi, Prithiviraj Chavan, Raj Thackeray

नव्या टोल धोरणाबाबत मुख्‍यमंत्र्यांचा राज ठाकरेंना ठेंगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नव्या टोल धोरणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ठेंगा दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेच्या आंदोलनानंतर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवे टोल धोरण जाहीर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला, मात्र नव्या टोल धोरणाचा पत्ता नाही, त्यामुळे आपल्या आंदोलनापुढे सरकार नमले हा राज ठाकरेंचा दावा कितपत खरा होता असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


राज्यात मनसेने टोलधाडीविरोधात आंदोलन केले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज ठाकरेंना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. या चर्चेत आपण मांडलेले मुद्दे मुख्यमंत्र्यांना पटले असून दहा कोटींच्या आत खर्च असलेले टोल नाके त्वरित बंद करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे राज यांनी तेव्हा सांगितले होते. तसेच लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवे टोल धोरण जाहीर करून त्यात आपल्या सूचनांचा समावेश करू, असे आश्वासन दिल्याचा दावाही राज यांनी केला होता. हे सगळे आपल्या आंदोलनाचे श्रेय असल्याचे सांगायलाही ते विसरले नव्हते. पण राज ठाकरेंना दिलेल्या आश्वासनांना मुख्यमंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे स्पष्ट झाले आहे, याबाबत आज दिवसभर ‘दिव्य मराठी’ने प्रमुख नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण कोणत्याही नेत्याने याबाबत प्रतिक्रिया दिली नाही.

मनसे नेत्यांचे मौन
तर दहा कोटींचा प्रकल्प खर्च असलेले जे 28 टोलनाके बंद केले जाणार होते, त्याबाबतही काहीही स्पष्ट आदेश संबंधित विभागाला देण्यात आलेले नाहीत. आजपासून लोकसभा निवडणुकांची आचारसंहितासुद्धा लागू झाली तरी राज्याच्या नव्या टोल धोरणाचा मात्र पत्ता नाही. त्यामुळे राज यांनी केलेले दावे हवेत विरलेत का? तसेच आता मनसे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन भंगाबाबत काय भूमिका घेणार याबाबत मनसेच्या प्रमुख नेत्यांनी चुप्पी साधली आहे.