आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणीच्या रत्नहाराची शान पुन्हा वाढणार, पिवळे एलईडी दिवे लावण्याचे न्यायालयाचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - "राणीचा रत्नहार' असा नावलौकिक असलेल्या मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर नुकतेच बसवण्यात आलेले एलईडी दिवे काढून त्याऐवजी पिवळ्या रंगाचा प्रकाश देणारे पूर्वीचेच सोडियम व्हेपर दिवे लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. एलईडी दिवे लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेनेसुद्धा विरोध केला होता. मात्र, भाजपने एलईडी दिव्यांचे समर्थन केले होते.

पूर्वीच्या दिव्यांचा प्रकाश कमी पडत असल्याने या परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणातील प्रतिमा स्वच्छ दिसत नाहीत, असा मुद्दा या संदर्भात दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरकारने मांडला. शिवाय एलईडी दिवे हे सोडियम व्हेपर दिव्यांच्या तुलनेत विजेची बचतदेखील करतात. त्यामुळे नवे एलईडी दिवे लावण्याचे आदेश दिले होते, असेही स्पष्ट करण्यात आले. मात्र, राणीचा रत्नहार असे ज्या रस्त्याचे वर्णन केले जाते त्या मरीन ड्राइव्हची रया आणि शान ही पिवळ्या दिव्यांमुळेच उठून दिसते, असे मत मांडत न्यायालयाने केलेली सूचना योग्य असल्याचेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. शिवाय एलईडी दिव्यांमध्ये पिवळ्या प्रकाशाच्या दिव्यांचा पर्यायदेखील उपलब्ध आहे, या बाबीकडे लक्ष वेधत ते लावल्यास दोन्ही हेतू साध्य होतील, अशी भूमिका सरकारने मांडली. त्यावर समाधान व्यक्त करत उच्च न्यायालयाने मरीन ड्राइव्हवरचे पिवळ्या एलईडी दिव्यांत त्वरित बदलण्याचे आदेश दिले. तसेच या मुद्द्यावरून सुरू असलेला राजकीय खेळ अयोग्य असल्याचे मतही उच्च न्यायालयाने व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...