आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: कायद्याची कायम खिल्ली उडवायचा ‘नौटंकीबाज’ मुस्तफा डोसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दुसऱ्या खटल्याच्या (केस बी) कामकाजादरम्यान डॉन मुस्तफा डोसा अनेकदा कधी अबू सालेमची, तर कधी सरकारी वकिलांची नक्कल करायचा. पंधरा दिवसांपूर्वी विशेष टाडा न्यायालयाने अब्दुल कय्युम या आरोपीची बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करताच त्याला शिवीगाळ करत त्याची गळाभेट घेत मुस्तफाने त्याचे नाटकी पद्धतीने अभिनंदन केले होते. कायद्याची अशी खिल्ली उडवणारा डोसा आपल्याला फाशी होणार या कल्पनेने मात्र अंतर्बाह्य हादरला होता. 
   
विशेष टाडा न्यायालयातील खटल्यात डोसाच्या ‘नौटंकीबाज’ स्वभावाचा अनेकदा प्रत्यय आला होता. या खटल्यात १६ जून २०१७ रोजी मुस्तफा डोसासह अबू सालेम, ताहिर मर्चंट, करीमुल्ला शेख, फिरोज खान आणि रियाज सिद्दिकी या सहा जणांना दोषी ठरवले होते, तर सातवा आरोपी अब्दुल कय्युमची निर्दोष मुक्तता केली. या वेळी खटल्याचे कामकाज संपताच भरन्यायालयात अब्दुल कय्युमला शिवीगाळ करत गळाभेट घेतली होती. तसेच दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवादादरम्यान फिरोज खान जेव्हा न्यायाधीशांसमोर रडून गयावया करत होता तेव्हा मुस्तफा डोसा आरोपींच्या पिंजऱ्यातील मागच्या बाकावर बसून फिरोज खानची थट्टा उडवत होता. “ये साX फिरोज ने तो सबके रेकाॅर्ड तोड डाले, क्या अॅक्टिंग कर रहेलाय.. इसने तो XX दिलीपकुमार, राज कुमार, शाहरुख - सलमान और वो नया छोकरा कौन आया अभी बाहुबली उसका भी रेकाॅर्ड तोडा है,’ असे वक्तव्य त्याने पत्रकारांकडे पाहून केले होते. आपल्याला एका गंभीर गुन्ह्यात दोषी ठरवले आहे याबाबत किंवा आपण केलेल्या कृत्याचा मुस्तफा डोसाला अजिबात पश्चात्ताप नव्हता हीच बाब या प्रसंगातून समोर आली होती.     

तुरुंगातून केली होती दोन मुलींची निवड  
मुस्तफाने कायमच भारतीय कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली. प्रत्येक कायदा किंवा नियम हा तोडण्यासाठीच असून तसे करण्यात त्याला मोठा अभिमान वाटे. तुरुंगातही कायदा धाब्यावर बसवून त्याने अनेक बेकायदेशीर बाबी केल्या. आपल्या मुलाच्या मालकीच्या दुबईतल्या शोरूममध्ये काम करण्यासाठी मुस्तफाने मुंबईतील न्यायालयाच्या आवारातच बारा मुलींची पाहणी करत दोन मुलींची निवडही केली होती, तर २ जानेवारी २०१७ रोजी डोसाला एका खटल्यासंबंधी गुजरातला घेऊन जात असताना या प्रवासादरम्यान अख्खी रात्र त्याने आपल्या माॅडेल पत्नीसोबत रेल्वेच्या बोगीत काढली होती.

२२ जून २०१७ रोजी या खटल्यातील विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी मुस्तफाचे कृत्य हे याकूब मेमनपेक्षा गंभीर आहे, असे सांगत त्याला फाशीच्या शिक्षेपेक्षा कमी शिक्षा सुनावली जाऊ नये, अशी मागणी केली होती. त्यावर सुनावणी संपताच आपल्याला ईदसाठी नवीन कपडे देण्यात यावेत, अशी मागणी मुस्तफा डोसाने न्यायालासमोर केली होती. अखेर ज्या कायद्याची डोसाने कायम थट्टा केली त्या कायद्याने जरी त्याला मृत्युदंड झाला नसला तरीही नैसर्गिक मृत्यू होण्यापूर्वी त्याच कायद्याने मुस्तफा दोषी असण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे ‘मुस्तफाने इथे केले आणि इथेच भोगले’ अशी प्रतिक्रिया पोलिस दलात व्यक्त केली जात आहे.
 
हे ही वाचा...
बातम्या आणखी आहेत...