आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम कदम, विश्वास पाटलांनी लाच स्वीकारण्याची सूचना केली, RTI कार्यकर्त्याने दाखवले 40 लाख रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत राबवण्यात येत असलेल्या पण अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील (एसआरए) बिल्डर किती मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करतात याचा भांडाफोड संदीप येवले या सामाजिक कार्यकर्त्याने बुधवारी अत्यंत धक्कादायक पद्धतीने उघड केले. या युवकाने बिल्डरांकडून मिळालेली ४० लाखांची रक्कम चक्क पत्रकार परिषदेत सादर करून त्यांचे पितळ उघडे केले. गैरव्यवहार उघडकीस आणू नयेत यासाठी बिल्डरांबरोबर आपले ११ कोटींचे डील झाले होते, असेही या युवकाने सांगितले.  
 
झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे बांधून देण्याच्या बदल्यात  बिल्डरांना प्रकल्प क्षेत्रावर वाढीव चटई क्षेत्र (एसएफआय) दिला जातो. राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मुंबईतील एसआरए योजना अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या आहेत. विक्रोळी पार्कसाइट येथील हनुमाननगर येथे एसआरए प्रकल्प चालू आहे. त्यासंदर्भात संदीप येवले याने माहिती अधिकारात (आरटीआय) सर्व माहिती जमा केली. ती माहिती प्रसिद्धी माध्यमांकडे देऊ नये यासाठी बिल्डराने संदीप येवले यांना एक कोटी रुपये देण्याचे मान्य केले.  

दोघांमध्ये तडजोड झाल्यानुसार ६० अाणि ४० लाख असे दोन हप्ते ठरले. दोन्ही हप्त्यांची म्हणजे एक कोटीची रक्कम येवले यांना मे महिन्यात मिळाली. त्यातील ४० लाखांच्या नोटांची बंडले येवले यांनी बुधवारी पत्रकारांसमोर सादर केली. बिल्डराकडून मिळालेल्या ६० लाखांमधील काही रक्कम आपण महाराष्ट्र मुक्ती माेर्चा या संघटनेसाठी खर्च केल्याची त्याने सांगितले. तसेच ४० लाख रुपये आपण मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे येवले याने सांगितले. हनुमाननगरच्या या प्रकल्पात २६० झोपड्या आहेत.   
 
अामदार, खासदारांकडे तक्रारी करणेही व्यर्थ  
एसआरए योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून साहित्यिक विश्वास पाटील हे नुकतेच पायउतार झाले. विक्रोळी पार्कसाइट प्रकल्पात लाच घेऊन तडजोड कर असे विश्वास पाटील यांनीच अापल्याला सुचवल्याचा अाराेप येवले यांनी केला. भाजपचे स्थानिक खासदार किरीट सोमय्या अाणि भाजपचे स्थानिक आमदार राम कदम यांच्याकडे एसआरएमधील गैरव्यवहाराच्या तक्रारी आपण केल्या होत्या. मात्र त्यांनी काहीही मदत केली नाही, उलट बिल्डरांशी डील करण्यास सांगितल्याचा आरोपही येवले या तरुणाने केला.
 
पुरावे द्या, अन्यथा दावा ठाेकू : अामदार कदम 
याप्रकरणी येवले यांनी पुरावे द्यावेत अन्यथा आपण त्यांच्यावर शंभर कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा करू, असा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी दिला आहे. एसआरए योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी निवृत्तीच्या काही दिवस अगोदर ४५० फायली क्लिअर केल्याचे प्रकरण ताजे असताना येवले यांना मिळालेल्या कोटीच्या लाचेचे प्रकरण पुढे आल्याने एसआरए योजनेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आले आहेत. एसआरए याेजना या नगरविकास खात्याच्या अखत्यारित येतात. सध्या नगरविकास खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. 
बातम्या आणखी आहेत...