आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण, गोपीनाथ मुंडेंच्या नावे योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन २०१५-१६ वर्षापासून राबवण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. याेजनेतील विमा हप्त्याची संपूर्ण रक्कम सरकार भरणार आहे. त्यात शेतकऱ्यांना एका वर्षासाठी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेसाठी आवश्यक निधी वितरित करण्यासही सरकारने मंजुरी दिली अाहे.
सातबारावरील नोंदीप्रमाणे १० ते ७५ वर्षे वयोगटातील १.३७ कोटी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल. सध्याच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेची मुदत ३० नोव्हेंबरला संपत असल्याने नव्या योजनेचा निर्णय घेण्यात आला. विम्या हप्त्यापोटी २७ कोटी २४ लाख ९३ हजार रुपये भरले जातील. या योजनेसाठी शेतकऱ्यांना विहित कागदपत्रांशिवाय इतर कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत.

विहित कालावधीत विमाधारक शेतकऱ्याचा अपघात किंवा अपंगत्व आले तरीही या योजनेचा लाभ मिळेल. अपघाती मृत्यू, अपघाताने २ डोळे अथवा २ अवयव निकामी, १ डोळा व १ अवयव निकामी अशा तिन्ही प्रकारच्या हानीसाठी दोन लाख रुपये, तर अपघातामुळे १ डोळा वा १ अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळेल.
सरकार भरेल विमा हप्ता
या योजनेअंतर्गत शेतकरी वा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्यांकडे स्वतंत्ररीत्या हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. सर्व विमाधारक शेतकऱ्यांचा हप्ता राज्य शासनाद्वारे भरण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काहीही संबंध असणार नाही. या योजनेचे लाभ स्वतंत्ररीत्या मिळणार आहेत.
काेणत्या संकटात मिळेल लाभ?
शेती करताना होणारे अपघात, रेल्वे, रस्त्यावरील अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडणे, खून, उंचावरून पडून अपघात, सर्पदंश, विंचुदंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, दंगल, अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी ही योजना राबवण्यात येईल.
वारसदार काेण?
मृत शेतकऱ्याची पत्नी, शेतकरी स्त्रीचा पती, अविवाहित मुलगी, आई, मुले, नातवंडे, विवाहित मुलगी या योजनेचे लाभ घेण्यासाठी वारसदार ठरणार आहेत. विम्याचा दावा करण्यासाठी अपघातग्रस्ताच्या नावाचा समावेश असलेला सातबारा, फेरफार नोंद, वारसाची नोंद, अपघाताच्या स्वरूपानुसार विहित केलेली इतर कागदपत्रे यांची आवश्यकता असेल.