आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलीम खान यांनी केली घरासमोरील पब्लिक टॉयलेट हटवण्याची मागणी, सेना-भाजप आमने सामने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - देशभर सध्या ‘स्वच्छ भारत’ मोहीम जाेरदार चालू आहे. अभिनेता अक्षयकुमार याचा तर याच ‘टाॅयलेट’ या विषयावर एक चित्रपटही येऊ घातलाय. देशभर स्वच्छ आझादीची ही चळवळ चालू असतानाच स्वप्ननगरी मुंबईत मात्र उलटी गंगा वाहत आहे. प्रसिद्ध  पटकथालेखक सलीम खान अाणि प्रख्यात अभिनेत्री वहिदा रहेमान या सेलिब्रिटीजनी त्यांच्या घरासमोरील जागेत हाेत असलेल्या  सार्वजनिक शाैचालय उभारणीला विराेध दर्शवला अाहे. या वादात राजकीय पक्षांनीही उड्या घेतल्या असल्याने या स्वच्छतागृहाचे काम ठप्प झाले अाहे.  
अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांचे बांद्रा पश्चिमेला गॅलक्सी अपार्टमेंट आहे. सीफेस व्ह्यू असणाऱ्या या आठमजली इमारतीत सलमान खान आपल्या बंधूंसह राहतो. त्यामुळे हे ठिकाण सध्या टुरिस्ट स्पाॅट बनलेले आहे. सलमानच्या घरापासून प्रोमोनेड सुरू होतो. सकाळ-संध्याकाळी या प्रोमोनेडवर गर्दी होते. बांद्रा बँडस्टँड रहिवासी संघाकडून प्रोमोनेडची देखभाल केली जाते. या प्रोमोनेडला आठवड्याला सुमारे तीन लाख लोक भेट देतात. इतके वर्दळीचे ठिकाण, पण येथे एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेने येथे पोर्टेबल टाॅयलेट उभारण्याचे ठरवले. त्यासाठी खड्डे खोदण्यात आले. तीन व्यक्ती वापर करू शकतील असा पोर्टेबल टाॅयलेटचा ढाचा बसवण्यात आला.    

मात्र या स्वच्छतागृहाची उभारणी हाेत असतानाच त्याला विराेधही सुरू झाला. सलीम खान, अभिनेत्री वहिदा रहेमान यांनी सदर शाैचालयाची जागा बदलावी, अशी मागणी करणारा अर्ज मुंबईच्या महापौरांकडे केला. प्रोमोनेडवर नागरिक ध्यान, योगासाठी येतात. शाैचालयामुळे हा परिसर अस्वच्छ होईल, असे सलीम यांचे म्हणणे आहे. त्या अर्जावर स्थानिक दोनशे रहिवाशांच्या सह्या आहेत. सलीम खान यांचा अर्ज येताच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शाैचालयाची जागा बदलण्याचे आदेश प्रशासनाला  दिले.   
 
शिवसेनेची ‘तत्परता’, भाजपचा अाराेप  :  मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्या महापौरांनी सलीम खान यांची बाजू घेतल्याने भाजपने या वादात उडी घेतली. स्थानिक आमदार व भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ‘भाई लोक’  विरोध करत असल्याचा आरोप केला, तर काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक अॅड. अासिफ झकेरिया यांनी टाॅयलेटची जागा बदलण्यासाठी आयुक्तांना पत्र लिहिले. या सर्व गोंधळात गेल्या पंधरा दिवसांपासून शाैचालयाचे काम ठप्प आहे.   
 
न्यायालयात जाण्याचा स्थानिकांचा इशारा  
सलीम खान यांचे गॅलेक्सी अपार्टमेंट अाणि प्रोमोनेड यामधून १०० फुटांचा रस्ता जातो. शाैचालय हे प्रोमोनेडवर उभारले जात अाहे. ते केवळ मूत्रालय आहे. मुंबईत २७३ लोकांमागे केवळ एकच शौचालय आहे.  असे असताना सलीम खान यांनी सार्वजनिक शाैचालयाविराेधी घेतलेल्या पवित्र्याविषयी आश्चर्य व्यक्त हाेतत आहे.  दरम्यान, विरोधाला न जुमानता शाैचालय उभारल्यास न्यायालयात जाण्याचा  इशारा स्थानिकांनी दिला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...