आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पर्यटन जिल्हा’ अाैरंगाबादच्या विमानतळावरील प्रवासी संख्येत घटनेच्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विमानाने राज्याच्या विविध भागात दाखल होणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या वर्षभरात ४ लाखांनी वाढली आहे. ‘पर्यटन जिल्हा’ असलेल्या अौरंगाबादेतील विमान प्रवाशांची संख्या मात्र रोडावली आहे, तर सोलापूर विमानतळावर पहिल्याच वर्षी २ हजार प्रवासी दाखल झाले आहेत. मात्र, त्याच वेळेस मुंबईसह पुणे, नागपूर येथील विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे.
औरंगाबादची विमान प्रवासी वाहतूक घटली असली तरी डीएमआयसीचे मुख्य केंद्र असलेल्या या शहरात विमानाद्वारे होणारी मालवाहतूक वाढली असल्याचे अार्थिक पाहणी अहवालात म्हटले अाहे.

औरंगाबादमध्ये अनेक कंपन्या असून अजिंठा, वेरूळसारखी पर्यटनस्थळेही आहेत. असे असतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्या रोडावल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय चार्टर्ड विमान प्रवासी वाहतुकीतही ६६ टक्क्यांनी घट झाली आहे.

पुणे विमानतळावरील प्रवासी वाहतूक १६.४ टक्क्यांनी तर मालवाहतूक २९.६ टक्क्यांनी वाढली. नागपूर विमानतळावरील प्रवाशांची संख्या ११.१ टक्क्यांनी तर मालवाहतूक ९.५ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या सोलापूर विमानतळावर वर्षभरात दोन हजार प्रवाशांनी भेट दिली.
आर्थिक पाहणी अहवाल नुकताच विधिमंडळात सादर करण्यात आला. वाहतूक व दळणवळण विभागाच्या आर्थिक पाहणीमध्ये राज्यातील विमानसेवेबाबत माहिती दिली आहे. राज्यात तीन आंतरराष्ट्रीय आणि आठ देशांतर्गत विमानतळे आहेत. २०१४-१५ या आर्थिक वर्षात राज्यात २७ लाख २१ हजार प्रवाशांनी विमानप्रवास केला होता. २०१५-१६ या आर्थिक वर्षात ही संख्या वाढून ३१ लाख २१ हजार अशी तब्बल ४ लाखांनी वाढली. प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही भागांत मुंबईने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबई विमानतळाच्या देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत १५.२ टक्क्यांनी वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मालवाहतुकीतही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रमशः १४.७ टक्के आणि चार टक्के अशी वाढ झाली आहे.
विमान वाहतूक वाढणे अपेक्षित असताना औरंगाबाद विमानतळाची प्रवासी वाहतूक कमी झाल्याचे दिसून येत आहे. २०१४ मध्ये ४.४१ लाख प्रवाशांची वाहतूक औरंगाबाद विमानतळावरून झाली तर २०१५ मध्ये यात ३.९ टक्क्यांनी घट होऊन ती ४.२४ लाखांवर आली. दुसरीकडे २०१४ मध्ये ८४३ मेट्रिक टन असलेल्या मालवाहतुकीत ४८.३ टक्क्यांनी वाढ होऊन ती १ हजार २५० मेट्रिक टन झाली आहे.
चार्टर्ड विमानातही घट
औरंगाबादेत चार्टर्ड विमानाने येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही २०१४ च्या तुलनेत घट झाली आहे. २०१४ मध्ये ०.०६ लाख असलेली ही वाहतूक २०१५ मध्ये ०.०२ लाखांवर येऊन ६६.७ टक्क्यांनी घट झाली. एमअायडीसीनेे रिलायन्स विमानतळ प्राधिकरणाला ९५ वर्षांच्या भाडेकराराने दिलेल्या लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ, नांदेड आणि बारामती या पाच विमानतळावरून २०१४-१५ मध्ये २,६७४ प्रवासी वाहतूक झाल्याचेही आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मालवाहतुकीत मुंबईनंतर ओझर विमानतळाचा क्रमांक
मालवाहतुकीत मुंबईने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर नाशिकच्या ओझर विमानतळाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. २०१४-१५ मध्ये या विमानतळावरून ४१ हजार १५० मेट्रिक टन मालवाहतूक झाली होती, तर २०१५-१६ जानेवारीपर्यंत हा आकडा ४२ हजार ७८३ मेट्रिक टनापर्यंत पोहोचला आहे.