आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन समाराेपाला वादविवादाची झालर, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे : महापाैर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाेंबिवली- दाेन दिवस काेणत्याही वादाविना पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समाराेप कार्यक्रमात रविवारी मात्र वादाच्या ठिणग्या पडल्याच. सीमा भागातील मराठी बांधवांबाबतचा मिळमिळीत ठरावाला अाक्षेप घेत शिवसेनेचे  कल्याण- डाेंबिवलीतील महापाैर राजेंद्र देवळेकर यांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह अखंड महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ अशी अाग्रही भूमिका व्यासपीठावरून मांडली, तर कल्याण- डाेंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याच्या ठरावालाही त्यांनी तीव्र अाक्षेप नाेंदवला.  

संमेलनाच्या समाराेप कार्यक्रमात दरवर्षी बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असा प्रस्ताव खुल्या अधिवेशनात मांडला जातो. मात्र, यंदाच्या संमेलनात केवळ सीमावादाचा प्रश्न न्यायालयात असून साहित्यिकांनी व साहित्य संस्थांनी मराठी भाषकाच्या लढ्याला बळ दिले पाहिजे, असा गुळमुळीत ठराव मांडण्यात अाला. त्याला शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘बेळगाव, कारवारसह अखंड महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ असा ठराव त्यांनी मांडला. त्यामुळे व्यासपीठावर मतभेदाचे वातावरण पसरले; पण अखेर देवळेकरांचा ठरावच मंजूर करण्यात अाला.   

...मीही अानंदी अाहे : काळे  : संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. अक्षयकुमार काळे यांनी नेटक्या अायाेजनाबद्दल आगरी यूथ फोरमचे अाभार मानले. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी यापूर्वी संमेलनाची संभावना ‘रिकामटेकड्यांचे संमेलन’ अशी केली हाेती. त्याचा संदर्भ देत काळेंनी ‘हजारो हृदये गहिवरती, तर मनही माझे गहिवरते. इतके लोक इथे आनंद घेत आहेत, त्यामुळे मीही आनंदी आहे’ या विंदा करंदीकरांच्या काही अाेळी मांडल्या. 
 
व्यापक वाङमयीग जागरण घडवणं, नवीन विषयांना सुरुवात करून त्यांची वाट मोकळी करून देणं, ही प्रक्रिया निरंतर चालू राहील हे पाहणं, ही संमेलनाची उद्दिष्टे असतात. ती बहुतांशी या संमेलनात पूर्ण झाली, असा विश्वासही काळेंनी व्यक्त केला.  साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी हे ट्रेंडसेटर संमेलन झाल्याचे म्हटले. ‘अक्षयकुमार काळे कोण?’ असा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचा निषेधही त्यांनी केला.
 
नगर परिषदेला विराेध  
कल्याण - डोंबिवली पालिकेच्या हद्दीतून २७ गावांना वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, असा ठरावही मांडण्यात अाला. त्यालाही महापाैर राजेंद्र देवळेकर यांनी विराेध दर्शवला. माइकचा ताबा घेत ते म्हणाले, ‘याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिले असून राजकीय निर्णयाला या मंचावर आणण्यास आपला विरोध अाहे.’ त्यांच्या या भूमिकेवर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी हा ठराव विरोधकांच्या सूचनेसह राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल, असे स्पष्ट करून वादावर पडदा टाकला.  
बातम्या आणखी आहेत...