मुंबई - जिल्हा परिषद व महापालिकांमध्ये मोठे यश मिळून भाजप राज्यात एक क्रमांकाचा पक्ष ठरेल, असा दावा करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या निकालाबाबत मात्र बुधवारी वेगळाच सूर लावला. ‘मुंबई महापालिकेच्या निकालात थाेडा फार फरक पडला तर युती तोडणाऱ्यांनीच युती करायची की नाही, हे ठरवावे’, असा टाेला शिवसेनेला लगावत भाजप सशर्त युतीस तयार असल्याचे संकेतही दिले.
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत भाजपच राज्यात नंबर वन राहणार असल्याचा दावाही दानवेंनी पत्रकारांशी बाेलताना केला. ते म्हणाले, ‘राज्यात २५ जिल्हा परिषद व १० महापालिकांच्या निवडणुका झाल्या अाहेत.
यापैकी २० जिल्ह्यांत तसेच पाच महापालिकांच्या प्रचारात मी जाऊन आलो आहे. तेथील जनमताचा आढावा घेताना भाजपच्या बाजूने कौल असल्याचे दिसून आले. निकालातही त्यांचे स्पष्ट प्रतिबिंब दिसणार असून गुरुवारी निकाल लागतील तेव्हा राज्यात सर्वत्र भाजपचे कमळ फुललेले दिसेल,’ असे ते म्हणाले.
मुंबईसह पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती, नागपूर अशा सहा महापालिकांमध्ये भाजपचाच महापौर येईल, असा दावा दानवेंनी केला. मात्र, भाजप स्वबळावर मुंबईत सत्तेवर येण्यासारखी खरेच परिस्थिती अाहे का? या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता दानवे बॅकफूटवर गेलेले दिसले. ‘मुंबईत जर शिवसेना माेठा पक्ष ठरला तरी महापाैरपद मिळवण्याएवढे बहुमत त्यांना न मिळाल्यास भाजपची भूमिका काय असेल?’ या प्रश्नावर दानवे म्हणाले. ‘मुंबईत थोडा फार फरक पडला तर युती तोडणाऱ्यांनी ती पुन्हा करायची की नाही ते ठरवावे. युती तोडण्याची घोषणा आम्ही केली नव्हती’, असे दानवे म्हणाले.
अाम्हाला यशाची खात्री : दानवे
महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपने रणनीती निश्चित केली होती. निवडणुकांच्या आधीपासून आमची तयारी सुरू असल्याने शेवटच्या क्षणी आम्हाला धावाधाव करावी लागली नाही. पालकमंत्र्यांनी अापापल्या जिल्ह्यात, तर आमदारांनी आपल्या मतदारसंघात काम करावे अशी रचना होती. याचबरोबर भाजपच्या कोअर ग्रुपने जिल्हा व मतदारसंघांमध्ये दौरे करून परिस्थितीचा आढावा घेत ताकद पुरवली. यामुळे आम्हाला यशाची खात्री वाटत आहे, असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.
परिवर्तनाला जनतेकडून प्रतिसाद
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. भाजपने प्रचारात कोणावरही वैयक्तिक टीका न करता मुंबईच्या विकासाचा अजेंडा लोकांसमोर मांडला. गेल्या दाेन - अडीच वर्षात केलेली कामे अाम्ही मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय नेते व राज्यातील नेत्यांनी प्रचारात हीच भूमिका मांडताना परिवर्तनाची हाक दिली. मुंबईकरांनीही त्याला मोठा प्रतिसाद दिला, असे दानवेंनी सांगितले.