आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय फीवाढीविरोधात न्यायालयात दाद मागणार, शिक्षण व्यापारीकरणविरोधी मंचची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
मुंबई - चिपळूण येथील वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या शुल्कवाढीविरोधात पालक आणि विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक करून मंत्रालयावरील आंदोलन होऊ दिले नाही. शुल्कवाढीसंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात २८ जून रोजी पालक, महाविद्यालय व्यवस्थापन व शिक्षक प्राधिकरण यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शुल्क कमी करण्याबाबचा निर्णय न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय नाही, असे शिक्षण व्यापारीकरणविरोधी मंचचे अध्यक्ष विवेक कोरडे यांनी सांगितले.   
 
शेकडो पालक आणि विद्यार्थ्यांनी मंगळवारी वांद्रे येथील शिक्षण शुल्क प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. त्यानंतर हा मोर्चा मंत्रालयावर येणार होता. मात्र, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून ठेवल्याने मंत्रालयावरील आंदोलन झाले नाही. त्यामुळे पालकांनी पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली. आम्ही सनदशीर मार्गाने मोर्चा काढणार होतो. मात्र, पोलिसांनी आम्हाला अटकाव केला. यासंदर्भात पालकांनी आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन अापली कैफियत मांडली. या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे  पालक हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. महाविद्यालयाने केलेल्या ८६ टक्के शुल्कवाढीमुळे पालकांना १५ लाखांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. महाविद्यालय, सरकार व शिक्षण प्राधिकरण कोणीही पालकांची बाजू ऐकून घेत नाहीत, असे पालकांनी आमदार बच्चू कडू यांना सांगितले.    
पालकांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर आमदार कडू यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. मेडिकलच्या फीवाढीविषयी चर्चा केली. त्या वेळी गिरीश महाजन यांनी याबाबत सर्व अधिकार शिक्षण प्राधिकरण यांना दिल्याचे सांगितले. पण सरकार म्हणून आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे कॉलेज व्यवस्थापक, पालक आणि शिक्षक प्राधिकरण यांची संयुक्त बैठक लावून तोडगा काढावा, अशी मागणी कडू यांनी केली. 
बातम्या आणखी आहेत...