आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थ्रीडी तंत्रज्ञानातून घरबसल्या मिळणार कृत्रिम पाय, वाचा कसा बनताे थ्रीडी कृत्रिम पाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अपघातात पाय गमावलेल्या व्यक्तींसाठी गुगल फाउंडेशन अाणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी देशातील काेणत्याही गावात घरबसल्या कृत्रिम पाय मिळेल, असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला अाहे. स्मार्टफाेनवरून फाेटाे पाठवूनही कृत्रिम पाय विनामूल्य घेता येणार आहेत.  

रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट या मुंबईतील धर्मादाय संस्थेने जयपूर फूटच्या माध्यमातून गेल्या ४० वर्षांत लाखाे दिव्यांगांना चालण्याचा अाधार दिला आहे. मात्र, अाता या जयपूर फूटने डिजिटल अवतार धारण केला असून गुगल फाउंडेशन, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट अाणि अायअायटी मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नातून यापुढे थ्रीडी तंत्रज्ञानाच्या मदतीने महालक्ष्मी येथे या कृत्रिम पायांची निर्मिती करण्यात येणार अाहे.    याबाबत ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता म्हणाले, गुगल, अाेअारजी या संस्थेने जगभरातील दिव्यांगांना व्यापक स्तरावर फायदा हाेऊ शकेल अशी अनाेखी संकल्पना राबवण्याचे अावाहन केले हाेते. याला प्रतिसाद देताना जगातील ८८ देशांमधून एक हजारपेक्षा जास्त संकल्पना सादर करण्यात अाल्या. रत्ननिधी ट्रस्टने थ्रीडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिव्यांगांना ते असतील त्या ठिकाणी कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली. गुगल फाउंडेशनला ही संकल्पना अावडली. त्यानंतर हा प्रकल्प राबवण्यासाठी दाेन काेटी रुपयांचे अनुदान मिळाले.    
 
 केवळ रेल्वे, रस्ते अपघातच नाही, तर गँगरीन, मधुमेहामुळेदेखील पाय कापावे लागतात. त्यामुळे हा थ्रीडी तंत्रज्ञानाने बनवलेला पाय दिव्यांगांना अाधार देईल. देश- विदेशातील दिव्यांगांनादेखील याचा फायदा हाेऊ शकेल, असे मेहता म्हणाले.
 
प्रत्येक जिल्ह्यात तंत्रज्ञ; टपाल सेवा  :  देशातील प्रत्येक जिल्ह्यात एका तंत्रज्ञाला कृत्रिम पाय बसवण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येणार अाहे. दिव्यांग व्यक्तीच्या तुटलेल्या पायाचे माेजमाप घेणे,  फाेटाे काढून ताे क्लाऊडवर अपलाेड करणे हे काम तंत्रज्ञ करेल. थ्रीडी तंत्रज्ञाने तयार झालेला पाय स्पीडपाेस्टद्वारे २०० रुपये खर्चात दिव्यांग व्यक्तीपर्यंत पाेहोचवण्यात येईल. हा पाय दिव्यांग व्यक्तीला बराेबर बसताेय की नाही याची खातरजमा करून त्याचा फाेटाेदेखील हा तंत्रज्ञ पाठवेल, असे मेहता यांनी सांगितले.  
 
असा बनताे थ्रीडी कृत्रिम पाय     
दिव्यांग व्यक्तीच्या तुटलेल्या पायाच्या अासपासच्या भागाचा स्मार्टफाेनने फाेटाे काढला जाताे. स्मार्टफाेनमधील साॅफ्टवेअरच्या मदतीने हा फाेटाे क्लाऊडवर अपलाेड केला जाताे. तुटलेल्या पायाच्या माेजमापाला सांकेतिक क्रमांक देण्यात येतो. क्लाऊडमधून अालेल्या इलेक्ट्राॅनिक फाइलद्वारे  कृत्रिम पाय बनवण्यात येत असलेल्या मुंबईतल्या महालक्ष्मी येथील कारखान्यात असलेल्या संगणकावर कृत्रिम पायाचे चित्र तयार हाेते. संगणकाने अाज्ञा दिली की थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने लगेचच त्या पायाचे उत्पादन सुरू हाेते. मानवी प्रक्रियेतून हा पाय तयार करण्यासाठी साधारपणे अाठ तास लागतात. मात्र, थ्रीडी तंत्रज्ञानामुळे उच्च प्लास्टिकपासून २४ तासांत हा कृत्रिम पाय तयार हाेताे.
बातम्या आणखी आहेत...