आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्जप्रकरणी ‘अॅव्हॉन’च्या १२ कारखान्यांवरही नजर, मुंबई, हैदराबादेतही हाेणार तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इफिड्रीन या अमली पदार्थाचा साठा सापडलेल्या सोलापूरच्या अॅव्हॉन लाइफ सायन्सेस या कंपनीच्या देशभरातील इतर १२ कारखान्यांचा माग काढण्यात ठाणे पोलिसांना यश आले अाहे. येत्या दोन दिवसांत या सर्व कारखान्यांचीदेखील तपासणी करण्यात येणार आहे. या १२ कारखान्यांव्यतिरिक्त कंपनीच्या मुंबई येथील विभागीय कार्यालय आणि हैदराबाद येथील मुख्यालयातही पोलिसांची पथके पोहोचली आहेत. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे हेदेखील अधिक तपासासाठी सोलापूरला रवाना झाले आहेत.

अॅव्हॉन लाइफ सायन्सेस या औषध कंपनीवर शनिवारी छापा मारून ठाणे पोलिसांनी तब्बल दोन हजार कोटी रुपये किमतीचा १९ टन इफिड्रीन साठा जप्त केला होता. या अमली पदार्थाचा बेकायदेशीर साठा आणि नशेसाठी विक्री केल्याप्रकरणी या कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणांना अटक केली आहे. आता कंपनीच्या मालकाचा शोध सुरू असून कंपनीच्या इतर ठिकाणच्या व्यवहारांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केलेल्या तपासात या कंपनीचे देशभरातील १२ कारखाने, मुंबईतील विभागीय कार्यालय आणि हैदराबाद येथील मुख्यालयाचे पत्ते मिळवण्यात पोलिसांना यश आले असून या सर्व ठिकाणची तपासणी केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. ज्याप्रमाणे सोलापुरातील साठा हा कंपनीच्या लेखा परीक्षणात न दाखवता बाळगला होता. त्याचप्रमाणे या कंपनीच्या इतर कारखान्यांमध्येही इफिड्रीन या अमली पदार्थाचा असा बेकायदेशीर साठा आहे का याची तपासणी केली जात आहे.
इतर आरोपींचा शोध सुरू
ठाण्यात अमली पदार्थाच्या एका नायजेरियन विक्रेत्याला अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला होता. या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे राज्याबाहेर तसेच देशाबाहेरही पसरले असण्याची शक्यता ठाण्याचे पोलिस अायुक्त परमबीर सिंग यांनी व्यक्त केली होती. तसेच या रॅकेटमध्ये अजूनही सात ते आठ जणांचा समावेश असून त्यापैकी किशोर राठोड, जय मुखी आणि पुनीत शृंगी या तीन सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. तसेच या कंपनीच्या संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांना ठाणे पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.