आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भालचंद्र नेमाडे, डाॅ. नागनाथ काेत्तापल्लेही पुरंदरेंच्या विराेधात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथात केलेले चित्रण वस्तुस्थितीला धरून नाही. आमच्या मनात शिवाजी महाराजांची प्रतिमा फार वेगळी आहे, असे सांगत पुरंदरे यांना दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार रद्द करण्यात यावा, अशी मागणी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे व इतरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली अाहे. या पत्रावर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, नारी समता मंचाच्या विद्या बाळ, भारतीय महिला फेडरेशनच्या मेघा पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांच्या सह्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले लेखन वर्चस्ववादातून केलेले असून ते अनेक दोषांनी डागाळलेले आहे, असा आरोप करत सामाजिक विचावंत डाॅ. आ. ह. साळुंखे यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्रक काढले आहे. यापूर्वीच माजी न्यायमूर्ती आणि प्रेस ट्रस्टचे माजी अध्यक्ष पी. बी. सावंत यांनीही यापूर्वीच या पुरस्काराला विराेध दर्शवला अाहे.
कार्यक्रम स्थळ बदलले
१९ आॅगस्ट रोजी मुंबईत या पुरस्काराचे वितरण हाेणार अाहे. हा कार्यक्रम मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात अायाेजित करण्यात अाला हाेता. परंतु मराठा सेवा संघ परिवारातील संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांचा विरोध असल्याने आता हा कार्यक्रम राजभवनात घेण्याचे निश्चित केले आहे. सरकारने धास्तीने स्थळ बदलले हाही अामच्या भूमिकेचा विजयच अाहे, अशी प्रतिक्रिया पुरस्कारविराेधी कृती समितीने दिली.
मर्यादा पाळाव्यात
प्रत्येक विषयावर प्रत्येकाने बोलायचे ठरवले तर मोठे वादंग उठतील. साहित्यिकांनी ऊठसूट कोणत्याही विषयावर मत व्यक्त न करता ज्याने-त्याने आपापल्या मर्यादा पाळाव्यात, अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेमाडे यांच्या प्रतिक्रियेवर व्यक्त केली.

हेमाडपंती झटका
जेव्हा पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला झाला तेव्हा पुरंदरे प्रभृतींनी इतिहासाची भिंत तिरकी बांधली आणि ती त्यांच्याच अंगावर पडली, अशी भूमिका नेमाडे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर पुरस्काराला विरोध करून पुरंदरे यांना नेमाडे यांनी दुसरा हेमाडपंती झटका दिला आहे.