आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपतींनी जातीयवाद्यांचा कडेलोटच केला असता, पुरंदरेंनी घेतला टीकाकारांचा समाचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यापासून सरकार आणि पुरंदरेंवर टीकेची झाेड उठली अाहे. त्यावर ‘आज शिवराय असते तर जातीयवाद करणाऱ्यांचा कडेलोट केला असता,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी टीकाकारांना चाेख प्रत्युत्तर दिले. तर ललित लेखन करण्यासाठी इतिहासकारांच्या दुप्पट इतिहासाचा अभ्यास करावा लागतो, अशा शब्दांत पुरंदरे यांनीही अप्रत्यक्षपणे टीकाकारांना टाेला लगावला.

पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, ‘सामान्य माणसाला छत्रपती कळावेत, महाराज कसे युगपुरुष होते, सामान्यांतले असामान्यत्व त्यांनी कसे जागृत केले, त्यातून महाराष्ट्र कसा घडवला हे पुरंदरे यांनी घराघरांत पोहोचवले. म्हणूनच त्यांना पुरस्कार देण्याला विरोध करणाऱ्यांना छत्रपती समजलेच नाहीत. जातीयवादी राजकारणामुळे त्यांना विरोध केला जातोय. मात्र आज शिवराय जिवंत असते तर त्यांनी असा जातीयवाद करणाऱ्यांचा कडेलोट केला असता. आम्ही बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण देऊ शकलो याचा अभिमान वाटतो,’ असे सांगतानाच बाबासाहेबांना आणखी पन्नास वर्षांचे दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली. आजवर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर कार्यक्रमात दिले गेले. मात्र या वेळेस हा कार्यक्रम राजभवनावर झाल्याने विरोधाच्या भीतीने सरकारने ही पळवाट शोधल्याची टीका होत अाहे. हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम आम्ही कोणाच्या भीतीने राजभवनावर घेतला नाही, तर भारतरत्न जसा राष्ट्रपती भवनात दिला जातो तसा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार राजभवनावर देण्याचा नवा प्रघात सुरू केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
मी सखोल अभ्यासक : पुरंदरे
पुरंदरे यांचा इतिहासाचा सखोल अभ्यास नाही, ते संशोधक नाहीत या टीकेला शिवशाहिरांनी अप्रत्यक्षपणे पण चाेख प्रत्युत्तर दिले. ‘इतिहासाचे संदर्भग्रंथ ठरतील असे लेखन करणाऱ्या इतिहासकारांच्या दुप्पट वाचन इतिहासाबद्दल ललित लेखन करणाऱ्याला करावे लागते,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या सखोल अभ्यासाबद्दल दावा केला. ‘सिंहगड जिंकल्यावर तेथे पेटवण्यात आलेली होळी आणि सुमारे २० किमी अंतरावरून ती दाखवत हा किल्ला आपण जिंकल्याचे
जिजाऊंना सांगणारे शिवराय, असे चित्र प्रसिद्ध चित्रकार दलाल यांनी रेखाटले होते. मला त्यांनी ते दाखवले. त्यात जिजाऊ केवळ २५ वर्षे वयाच्या दिसत होत्या, त्यांच्या कपाळावर कुंकू होते. मात्र प्रत्यक्षात सिंहगड जिंकला तेव्हा जिजाऊ ७० वर्षांच्या विधवा होत्या, हे लक्षात आणून देत मी चित्रातील चूक दाखवली. यावरून ललित कलाकार, लेखकाला इतिहासाचा कसा सूक्ष्म अभ्यास असावा लागतो, हे लक्षात येईल. प्रसिद्ध इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांना एका किल्ल्याचे नाव वाचून हा किल्ला पुण्याच्या जवळ कुठे आहे हे कळत नव्हते. तेव्हा मी त्यांना सांगितले की हा किल्ला सिंहगडच असून त्याचे औरंगजेबाने वेगळे नाव ठेवले होते. औरंगजेबाची मूळ कागदपत्रे वाचल्याने माझ्याकडे ही माहिती होती,’ अशा शब्दांत पुरंदरेंनी सखोल अभ्यासाचा परिचय यावेळी दिला.

पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, काेण काय म्‍हणाले..