आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPECIAL : क्रिकेटप्रमाणे बॅडमिंटनपटूंचे यश लोकप्रियतेमध्ये कधी परावर्तित होणार ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - घोट्याला झालेल्या दुखापतीने श्रीकांत किदांबीला वर्ल्ड नंबर तीनवरून बावीसपर्यंत खाली नेले. त्यातून सावरून श्रीकांत रिओ ऑलिम्पिकला उपांत्य फेरीच्या प्रवेशद्वारावर पोहोचला. रविवारी तर श्रीकांतने बॅडमिंटन विश्वातील सार्वभौमत्वासमान असलेल्या इंडोनेशियन सुपर सिरीजचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. या वाटचालीत त्याने वर्ल्ड नंबर एक व दोन यांना हरवले. दुसऱ्या बाजूने एच. एस. प्रणॉयने लि चाँग वेई आणि ऑलिम्पिक चॅम्पियन ची लाँगला हरवून भारताच्या मक्तेदारीचा दबदबा निर्माण केला. सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांना ऑलिम्पिक पदकानंतर पुरस्कर्ते मिळाले. मात्र आज विश्व अजिंक्यपदाच्या तोडीच्या स्पर्धा जिंकूनही भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूंना उपेक्षेपलीकडे फारसे काही मिळत नाही.  
 
श्रीकांतने दिव्य मराठीशी या खेळाच्या व्यथेविषयी चर्चा केली होती. तो म्हणाला, ‘हा खेळ खूपच खर्चिक आहे. शटल कॉक महागडी आहेत. कोर्टचे भाडेही परवडणारे नाही. त्यामुळे क्रिकेट किंवा अन्य खेळांमध्ये भारतात जशी संख्या मोठी असते, स्पर्धा मोठी असते तशी या खेळात दिसत नाही.’  
 
श्रीकांतची दुसरी खंत होती, विजय मिळवल्यानंतर क्रिकेट किंवा अन्य काही खेळांप्रमाणे बॅडमिंटनपटूंना ‘हीरो’ची प्रतिमा लाभत नाही.  मात्र आम्हाला त्याबाबत काहीही वाटत नाही. देशाची ‘जर्सी’ अंगावर असली की अंगात वेगळाच जोश येतो. देशासाठी खेळतोय ही भावनाच वेगळी ऊर्जा देत असते. खेळताना देशातही फारसे प्रेक्षक प्रोत्साहन देण्यासाठी नसतात, परदेशात तर अपेक्षाच करता येत नाही तरीही आम्ही प्रोत्साहन देणारा एखाददुसरा स्वर कानात साठवून झुंज देत असतो. देशाच्या आणि आमच्या नावाने ठोकली गेलेली आरोळी, लढण्याची जिद्द, ईर्षा देत असते, असेही यावेळी त्याने म्हटले.  
 
 - विजय मिळवल्यानंतर क्रिकेट किंवा अन्य काही खेळांप्रमाणे बॅडमिंटनपटूंना ‘हीरो’ची प्रतिमा लाभत नाही.  - श्रीकांत
बातम्या आणखी आहेत...