आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवंश हत्याबंदीला स्थगिती नाही; बकरी ईदसाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बकरी ईदसाठी गोवंश हत्याबंदी आणि मांसविक्री बंदीला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

बकरी ईदनिमित्त २५ ते २७ सप्टेंबर या काळात गोवंश हत्या व मांसविक्रीवरील बंदी उठवावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती व्ही. एल. आंचलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गोवंश हत्या व मांसविक्रीवर बंदी घालणाऱ्या महाराष्ट्र पशू संरक्षण (दुरुस्ती) कायद्याच्या कलम ५ ला स्थगिती देण्याचा आमचा विचार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. ‘सरकारच्या वैधानिक अधिकारांना अंतरिम स्थगिती देता येते का? या कायद्यानुसार कायदा शिथिल करण्याचा अधिकार असता तर या फेरविचार करावा, असे आम्ही सरकारला सांगितले असते. असे खंडपीठाने
म्हटले आहे. पशूंची हत्या, त्यांचा बळी देणे हा मुस्लिमांच्या धार्मिक मान्यतेचा अत्यावश्यक भाग आहे, हा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणी अंतिम सुनावणी १२ ऑक्टोबरला होणार आहे.
मुस्लिमांना सूट का नाही?
अस्लम आलमगीर मलकानी व इशाक अब्दुल अजीज शेख यांनी ही याचिका दाखल केली आहे. अॅड. गायत्री सिंग व अॅड. एजाझ नक्वी यांनी याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडली. ‘जैन समुदायाच्या पर्युषण पर्वादरम्यान पशू हत्या आणि मटण विक्रीवर बंदी घालणारे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले होते. मग मुस्लिमांसाठी मटण विक्रीवर बंदी घालणारा कायदा शिथिल का केला जात नाही,’ असा प्रश्न नक्वी यांनी याचिकाकर्त्यांची बाजू पटवून देताना विचारला.