आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेबांचे स्मारक रखडले; दिरंगाईमुळे उद्धव ठाकरेंची मंत्र्यांवर नाराजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवेसनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची घोषणा होऊन तीन महिने झाले तरी स्मारकाचे गाडे एक इंचही पुढे सरकलेले नाही. शिवसेना पक्षप्रमुख या दिरंगाईने नाराज झाले असून काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांनाही फैलावर घेतले होते. मात्र, शिवसेनाप्रमुखांचे स्मारक हे लालफितीत अडकल्याचे दिसून येत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आणि मुख्यमंत्र्यांनीही शेरा मारून ते पत्र पालिका आयुक्तांकडे रवाना केल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. शनिवारी शिवसेनाप्रमुखांची जयंती असून या दिवशी तरी स्मारकाचे गाडे पुढे हलेल, असे म्हटले जात आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीदिनी महापौर बंगल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर स्मारकातच शिवसेनाप्रमुखांचे स्मारक होईल आणि पुढील पुण्यतिथीला शिवसैनिक महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहतील, असे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करत भव्य स्मारक बांधले जाईल, असे म्हटले होते. या वेळीच एका ट्रस्टद्वारे हे स्मारक उभारून उद्धव ठाकरे यांना ट्रस्टचे अध्यक्षपद देऊन अन्य सदस्यांची महिन्यात नेमणूक केली जाईल, असेही घोषित करण्यात आले होते. १८ नोव्हेंबर रोजी ही घोषणा करण्यात आली. परंतु अजूनही स्मारकाच्या कामाला कसलीही सुरुवात झालेली नाही.

उद्धव ठाकरे यांच्या इच्छेनुसार मुख्यमंत्र्यांनी स्मारकासाठी महापौर बंगला देण्याची तयारी दर्शवली, परंतु त्यांनाही त्या ठिकाणी स्मारक होणे कठीण आहे हे चांगले ठाऊक होते. परंतु कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीतील कटुता काही प्रमाणात कमी व्हावी म्हणून त्यांनी महापौर बंगल्याची घोषणा केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

स्मारकाबाबत काहीही हालचाल होत नसल्याने उद्धव ठाकरे प्रचंड नाराज झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सुभाष देसाई व अन्य काही मंत्र्यांना त्यांनी याचा जाबही विचारला होता. मंत्रालयात बसून तुम्ही काय करता, फॉलोअप घेता येत नाही का, अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत विचारणा केली जाते, असे मंत्र्यांनी सांगितले. परंतु त्याने उद्धव ठाकरे यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्मारकाचे काम लवकर सुरू करावे अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी शेरा मारून हे पत्र पालिका आयुक्तांकडे पाठवले.
न्यायालयात जाऊ शकते प्रकरण
सरकारने स्मारकाची घोषणा केली असली तरी कागदोपत्री अजून काहीही झाले नाही. कागदोपत्री याची नोंद झाल्याबरोबर काही जण न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच न्यायालयात हे प्रकरण टिकावे आणि स्मारकाचे काम सुरळीत व्हावे, असा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
महापौर बंगल्यात स्मारक कठीण
सूत्रांनी पुढे सांगितले, मुख्यमंत्र्यांनी पत्रावर लाल अक्षरात नियमानुसार परवानगी द्यावी असे स्पष्टपणे लिहिले आहे. याचा अर्थ असा की, महापौर बंगल्यात स्मारक करणे कठीण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकारी इमारतीत कोणाचेही स्मारक उभारता येत नाही आणि त्यामुळेच महापौर बंगल्यात स्मारक उभारणे कठीण आहे. दिव्य मराठीनेच सर्वप्रथम ही बाब उघडकीस आणली होती. बाळासाहेबांचे स्मारक लोकांच्या इच्छेनुसारच व्हावे असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. मी त्यांचा मुलगा असल्याने स्मारकासाठी पुढाकार घेण्याऐवजी लोकांनीच स्मारक उभारावे असे त्यांचे मत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.