आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काहीही झाले तरी मुंबईत महापाैर भाजपचाच,सत्तेच्या गणिताची CM बंगल्यावर जुळवाजुळव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जाेरदार मुसंडी घेत ८२ नगरसेवक निवडून अाणलेल्या भाजपनेही महापाैरपदावर दावा ठाेकला अाहे. केंद्रातील पक्षश्रेष्ठींनीही ‘मुंबईत अापलाच महापाैर हवा’ असा संदेश पाठवल्यामुळे प्रदेश भाजपचे नेते कामाला लागले अाहेत. काही अपक्षांना गळाला लावण्याचाही त्यांचा प्रयत्न अाहे. याशिवाय शिवसेनेसाेबत युतीचा पर्यायही पक्षातील नेत्यांनी खुला ठेवला अाहे, खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी तशी अपेक्षा बाेलूनही दाखवली अाहे. 
 
बंडखोरी करून शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या आणि अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या स्नेहल मोरे यांना भाजपमध्ये येण्याची  आॅफर देण्यात आली होती. पण त्यांचे दीर व  शिवसेनेचे माजी पदाधिकारी सुधीर मोरे यांनी भाजपचा प्रस्ताव धुडकावून ‘माताेश्री’वर जाऊन शिवसेनेतच प्रवेश केला. 
 
अापण हाडाचे शिवसैनिक असल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. मोरे यांच्यासह  पाच अपक्ष नगरसेवक निवडून आले असून यापैकी चार जण शिवसेनेच्या गळाला लागले अाहेत. त्यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या अाता ८४ वरून ८८ वर पोहोचली आहे. भाजपला मात्र अद्याप एकाही अपक्ष नगरसेवकाला खेचण्यात यश अालेले दिसत नाही. 
 
दरम्यान, महापौरपदाचे गणित जमवण्यासाठी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर काेअर कमिटीची बैठक घेऊन त्यात खलबते करण्यात अाली. तसेच या बैठकीत राज्यातील भाजपच्या कामगिरीचा आढावा घेतला गेला. इतर पर्यायांसह शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठीही या वेळी विचार करण्यात आल्याचे  कळते. 
   
अपक्षांनी धुडकावली भाजपची अाॅफर, शिवसेनेत प्रवेश 
घाटकाेपर येथील शिवसेनेचे बंडखाेर सुधीर माेरे व अपक्ष नगरसेविका स्नेहल माेरे यांना भाजपने अापल्यासाेबत येण्यासाठी अाॅफर दिली हाेती. मात्र ती धडकावून या दाेघांनीही थेट ‘माताेश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्यास पसंती दिली.
 
शिवसेनेचाही पर्याय खुला    
मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने शिवसेनेशी युती करण्याचा पर्यायही खुला ठेवला अाहे. त्या दृष्टीने भाजपच्या काही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे तसे प्रस्तावही मांडले. कल्याण-डोंबिवली मनपा निवडणूक निकालानंतर मुंबईसारखीच स्थिती झाली होती. त्यानंतर दाेघांनी प्रत्येकी अडीच वर्षे महापौरपद वाटून घेतले होते. तसेच स्थायी समितीच्या अध्यक्षांसह इतर महत्त्वाच्या  पदांचीही समान विभागणी केली. तसाच पर्याय भाजपकडून शिवसेनेसमोर ठेवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 भाजपचा देशभर विजय दिन साजरा करणार
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळवलेला नेत्रदीपक विजय अाणि ओडिशाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधे मिळालेल्या यशाचा अानंद व्यक्त करण्यासाठी भाजप २५ फेब्रुवारी राेजी देशभर जिल्हा मुख्यालयात विजय दिवस साजरा करणार आहे. यानिमित्ताने नोटाबंदीला देशातल्या जनतेचे समर्थन असल्याचा  संदेशही दिला जाणार अाहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी रायगडावर जाणार आहेत.  
 
एका अपक्षावरच भाजपची मदार  
शिवसेना व भाजपनंतर काँग्रेस ३१ नगरसेवकांसह तिसऱ्या क्रमांकावर असून राष्ट्रवादीची संख्या आहे ती नऊ. मनसे ७, समाजवादी पार्टी ६, एमआयएम  २ व अखिल भारतीय सेना १ अशी इतर पक्षांची स्थिती आहे. अरुण गवळीची अखिल भारतीय सेना शिवसेनेच्या  बाजूने उभे राहण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी, एमआयएम  कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या बाजूने जातील असे वाटत नाही. याउलट  हे सारे पक्ष प्रसंगी शिवसेनेला मदत करू शकतात, अशी शक्यता असल्याने भाजपच्या नेत्यांनी आधी अपक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पाच अपक्षांपैकी चार नगरसेवक आधीच शिवसेनेच्या तंबूत गेल्याने आता भाजपची अाशा एकावरच उरली अाहे.

काय म्हणाले शेलार...
- 82 पेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा होती. 
- अहंकारी नेतृत्वाच्या जागी बसायचे नव्हते त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला. 
- गेल्या दीड वर्षांपासून या निवडणुकीची तयारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सुरू होती. 
- मराठी माणसाच्या हितासाठी सर्वच आवाज उठवतात पण त्यासाठी इतरांकडे दुर्लक्ष करणे भाजपला मान्य नाही. 
- मराठी मतदार असलेल्या 27 जागा भाजपला मिळाल्या. 
- युतीबाबत अजून कोणतीही बोलणी सुरू नाही. 
- युतीच्या बोलणी सुरू असताना शिवसेनेने आमचे कोणतेही मुद्दे मान्य केले नाहीत. 
- आम्हाला मुंबईकरांना दिलेली वचने पूर्ण करायची आहेत, त्यामुळे आम्हाला महापौर हवा आहे. पण त्यासाठी अपारदर्शक असे काहीही करण्याची तयारी भाजपची नाही. 
- निवडणूकीच्या काळात शिवसेनेची आणि काँग्रेसची छुपी युती होती या मतावर मी कायम आहे. 
- युतीबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. 
- फडणवीस हा विकासाचा चेहरा आहे, त्यामुळे त्यांचा चेहरा दाखवूनच आम्ही मते मागणार. 
- सामना आणि तरुण भारत यांच्यात फरक आहे, सामना मुखपत्र आहे तर तरुण भारत वृत्तपत्र आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...