आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडी शर्यत: शर्यतींचे शूटिंग, बैलांचे फिटनेस प्रमाणपत्र सक्तीचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उच्च न्यायालयाने राज्यात बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास मनाई केल्यानंतर शर्यतीमध्ये बैलांना इजा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विकास विभागाने स्पर्धेसाठी कठोर नियमावली जाहीर केली आहे. स्पर्धेत बैलांना काठीने मारणे, उत्तेजक द्रव्य देण्यास मनाई करण्यात आली आहे. यापुढे बैलांची आरोग्य तपासणी सक्तीची राहणार असून त्यांचे आराेग्य प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. तसेच शर्यतीचे व्हिडिओ चित्रीकरण नव्या नियमावलीत बंधनकारक करण्यात आले आहे.  
  
आयोजकांना शर्यतींच्या आधी पंधरा दिवस ५० हजार रुपयांच्या बँक हमीसह जिल्हाधिकाऱ्यांकडे शर्यतीच्या आयोजनाचा अर्ज करावा लागणार आहे. शर्यत ठिकाणाच्या तपासणीनंतर संबंधित अधिकारी जिल्हाधिकाऱ्याला अहवाल सादर करतील. त्यानंतर नियमातील शर्थींना अधीन राहून सात दिवसांत शर्यत आयोजित करण्यासाठीची परवानगी दिली जाईल.   प्राणिमित्र संघटनांच्या आक्षेपांची दखल घेत उच्च न्यायालयाने नुकतीच बैलगाडी स्पर्धांच्या आयोजनाला मनाई केली आहे. बैलगाडी स्पर्धांत बैलांना इजा होणार नाही याविषयी सरकार जोपर्यंत नियमावली बनवत नाही तोपर्यंत त्याला आम्ही परवानगी देणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.    त्यानंतर राज्य सरकारनेे बैलगाडी शर्यतीसाठी विधिमंडळात कायदा संमत केला. त्याला राष्ट्रपतींची मंजुरीसुद्धा िमळाली आहे. आता ही नियमावली उच्च न्यायालयासमोर ठेवली जाईल. 

जिल्हा साेसायटी ठेवणार स्पर्धेवर नजर
- एक हजार मीटरपेक्षा अधिक लांब शर्यतीचे अंतर नसेल.    
- बैलांना धावपट्टीवर आणण्यापूर्वी किमान २० मिनिटे आराम द्यावा लागेल.   
- बैलास काठीने, पायाने मारणे, चाबूक किंवा त्यासारख्या इतर साधनांचा वापर करता येणार नाही.   
- शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलांच्या किंवा वळूच्या जोड्या, त्यांचे वय, वजन, स्वास्थ्य इत्यादीनुसार सुसंगत असाव्यात.   
- बैलगाडी शर्यतीसाठी बैलांना इतर कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांसोबत जुंपण्यास बंदी राहील.   
- प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा सोसायटी बैलगाडी शर्यतीच्या आयोजनावर देखरेख ठेवेल.   
- शर्यतीआधी बैलांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र आवश्यक राहील. शर्यतीच्या दिवसापासून ४८ तास या प्रमाणपत्राची वैधता राहील   
- शर्यतीदरम्यान बैलांना उत्तेजक द्रव्य, मादक पदार्थ, हानिकारक पदार्थ देण्यास पूर्णतः मनाई असेल.   
- प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी धावपट्टीच्या दोन्ही बाजूला प्रतिबंधात्मक कठडे उभारावे लागतील.   
- स्पर्धकांची माहिती, शर्यतीचा पूर्तता अहवाल आणि संपूर्ण आयोजनाचे डिजिटल स्वरूपातील चित्रीकरण शर्यत समाप्तीनंतर पंधरा दिवसांत - जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणे बंधनकारक राहील.
बातम्या आणखी आहेत...