आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता थेट पाचवी, अाठवी, दहावी, बारावीला प्रवेश; राज्यातील रात्रशाळा सुरुच राहाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील रात्रशाळा बंद होणार नसल्याचे सांगण्यात आले. - Divya Marathi
राज्यातील रात्रशाळा बंद होणार नसल्याचे सांगण्यात आले.
मुंबई  - शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या मुलांना शिक्षणाची पुन्हा संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या मंडळाकडून बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी  पाचवी, आठवी,  दहावी व इयत्ता १२ वी या वर्गासाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत.  यापूर्वी १० व १२ वी परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनाही मुक्त विद्यालयाचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील अंदाजे पाच लाख मुलांची शिक्षणातून होणारी गळती थांबविण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रयत्न होणार आहेत.  
 
शिक्षणातील गळती कमी करणे, प्रौढ कामगार, प्रौढ आदिवासी, गिरिजन, गृहिणी या सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, जीवनाला उपयुक्त असे व्यवसायाभिमुख शिक्षण देणे, सुशिक्षित आणि जागरूक नागरिक   बनविणे, स्थानिक स्तरावर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे ही उद्दिष्टे ठेवून मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळास इयत्ता पाचवी, आठवी, दहावी आणि बारावी या वर्गासाठी परीक्षा घेण्याचे अधिकार राहणार आहेत.  हे मंडळ राज्य शिक्षण मंडळाचा भाग म्हणून कार्यरत असेल. १० वी समकक्ष परीक्षेसाठी विद्यार्थी किमान दोन वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागेल.  या परीक्षेसाठी संबंधित विद्यार्थी औपचारिक शाळेत कधीही गेलेला नसल्यास त्यास प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.  १२वी समकक्ष परीक्षेस इच्छुक विद्यार्थी कोणत्याही मान्यता प्राप्त मंडळाची १० वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.  
 
मुक्त विद्यालय मंडळात विविध स्तरांवर विषय निश्चित करण्यात आले आहेत. या विषयांसाठी स्वतंत्र अभ्यास मंडळे तसेच स्वयं अध्ययन साहित्य निर्माण करण्यात येणार आहे. 
या संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे.  त्यात विविध शासकीय विभागांच्या प्रतिनिधीसह मुक्त शिक्षण क्षेत्रातील पाच तज्ज्ञही समाविष्ट असतील. 
 
वर्गनिहाय वयाेमर्यादा  
पाचव्या इयत्तेसाठी (अथवा समकक्ष) परीक्षा द्यायची असल्यास त्या शैक्षणिक वर्षाच्या १ जुलै रोजी उमेदवाराचे किमान वय १० वर्षे असणे गरजेचे आहे. आठव्या इयत्तेसाठी (अथवा समकक्ष) किमान वय १२ वर्षे, १० वीसाठी (अथवा समकक्ष) १४ वर्षे आणि १२ वीसाठी (अथवा समकक्ष) किमान वय १६ वर्षे असणे गरजेचे आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वयाचा अथवा वयाबाबत वैद्यकीय दाखला सादर करावा लागेल. तसेच किमान लेखन- वाचन कौशल्य व अंकज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. यापूर्वी हा विद्यार्थी औपचारिक शाळेत गेला असल्यास ती सोडल्याचा दाखला अथवा प्रमाणपत्र सादर करावे लागेल.  
 
सलग नऊ परीक्षा देण्याची संधी  
मार्च आणि एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी १ मे ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांना नावनोंदणी करता येईल, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल या कालावधीत नावनोंदणी करता येईल. एकदा केलेली नोंदणी पाच वर्षांसाठी वैध राहील. या नोंदणीद्वारे सलग पाच वर्षे किंवा सलग ९ परीक्षांची संधी उमेदवारास दिली जाणार आहे.
 
राज्यातील रात्रशाळा बंद हाेणार नाहीत  
-शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात अाला अाहे. मुक्त विद्यालय मंडळाद्वारे प्रौढ कामगार, गृहिणी या सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. तसेच जीवनाला उपयुक्त असे व्यवसायाभिमुख शिक्षण या मंडळामार्फत मिळू शकेल.   
- मुक्त विद्यालय मंडळ हे राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असेल, अभ्यासक्रम मात्र वेगळा असेल.
- या मंडळामुळे एकही रात्रशाळा बंद होणार नाही. जे विद्यार्थी रात्र शाळांमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहेत, त्यांचे शिक्षणही सुरू राहील.
- या मंडळामार्फत कौशल्य संपादित करून  व्यवसाय उपयोजन करण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी विविध अभ्यासक्रम तयार केले जातील.  
- या मंडळांतर्गत मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि संस्कृत आदी विषयांसह अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान कौशल्य विकास, बेकरी उत्पादन, स्क्रीन प्रिंटिंग, माहिती तंत्रज्ञान, सहकार आदी विषयांचाही समावेश असेल.
 
पुढील स्लाइडवर वाचा, शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीची दाखल्यावर अाता गरज नाही, विदेशातही नाशिकचे ब्रँण्डिंग करू : मुख्यमंत्री...  
 
बातम्या आणखी आहेत...