आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन नागरिकांना गंडवणारा बोगस कॉल सेंटर घोटाळ्याचा मास्टर माइंड शॅगी गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या वर्षी गाजलेल्या मीरा रोड येथील बोगस कॉल सेंटर घोटाळ्याचा मास्टर माइंड सागर ठक्कर ऊर्फ शॅगी याला अटक करण्यात अखेर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले. मुंबई विमानतळावर शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन ठाणे पोलिसांकडे सुपूर्द केले. दरम्यान, शॅगीच्या विरोधात अमेरिकेतही गुन्हा दाखल आहे.      
 
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मीरा रोड येथील सात बोगस कॉल सेंटरवर छापे टाकून पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकेच्या इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे अधिकारी असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांना कराची थकबाकी असल्याचे खोटे फोन कॉल्स करत असत. तसेच अटकेची किंवा तुरुंगवासाची भीती घालून त्यांच्याकडून दंडाची रक्कम उकळत असत. अशा प्रकारे या माध्यमातून सुमारे ३०० कोटी रुपयांना नागरिकांना गंडवण्यात आले.  याप्रकरणी ठाणे पोलिसांनी तब्बल १७६ जणांना अटक केली होती. मात्र, या घोटाळ्याचा सूत्रधार असलेला सागर ठक्कर हा देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात लूकअाऊट नोटीस जारी करून अटकेसाठी आवश्यक असलेले स्टँडिंग वॉरंट प्राप्त केले होते. ठाणे पोलिसांच्या वतीने वेळोवेळी इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना सागरच्या ठावठिकाण्याविषयीची माहिती देण्यात येत होती. त्यानुसार  त्याला अटक करण्यात आली. 
 
शॅगीकडून गुन्ह्याची कबुली  
शॅगी हा ७ एप्रिल रोजी दुबईमार्गे मुंबईत येत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर  तातडीने हालचाली करत त्याला मुंबई विमानतळावर उतरताच अटक करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत सागरने गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयात हजर केले असता त्याला १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शॅगीच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील उर्वरित आरोपींपर्यंत पोहोचण्यात आम्हाला नक्की यश मिळेल, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.
 
पुढील स्लाईडवर वाचा, मुंबईत ७० लाखांच्या बनावट नोटा जप्त...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...