आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरीपाठोपाठ हरभराही हमी भावाने घेणार, शिवसेनेसोबत वाद नाही : फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने राज्य सरकारने तूर खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. गोण्यांची कमतरता जाणवल्याने १६ लाख गोण्या नव्याने विकत घेतलेल्या आहेत. ५०५० दराने तूरडाळ विकत घेतली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. तुरीपाठोपाठ हरभराही हमी भावाने सरकार विकत घेणार असून खासगी गोदामे भाड्याने घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.   
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ८९४ कोटी रुपये देण्यात आले असून खरीप हंगामासाठी ४२०५ कोटी रुपये दिले आहेत, तर नव्याने लातूर विभागासाठी ४०२ कोटी दिले आहेत. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई संपूर्णपणे दिली जाणार असून काहीही शिल्लक ठेवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.   

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा विजेची आवश्यकता असल्याने सोलारवर चालणारे कृषिपंप देण्याची योजना सरकारने तयार केली आहे. सोलर फीडर तयार करण्यात येत असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज देता येईल. सरकारने ३५ लाख कृषिपंप देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला वेळ लागत असल्याने आणि आता सोलरसाठी मोठी पॅनेल्स न लावता सोलर फीडर तयार केल्याने कृषिपंपाऐवजी सोलरवरील कृषिपंप देण्याचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.   शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी महापौरपदासाठी अरुण गवळीची तुरुंगात भेट घेतल्याचा आरोप केला. त्याबाबत विचारताच, पुराव्यानिशी आरोप केले तर मी त्या आरोपांना उत्तर देईन, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.   
 
शिवसेनेसोबत वाद नाही  
विरोधकांकडे नवीन मुद्दे नसल्याने त्यांनी नेहमीचेच मुद्दे मांडलेले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला जनतेने जो कौल दिला आहे त्यामुळे त्यांना निराशा आल्यानेच नेहमीचे मुद्दे मांडले आहेत. शिवसेनेसोबतच्या वादाबाबत ते म्हणाले, राज्य सरकारमध्ये आम्ही एकत्रच आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सरकारला पूर्ण समर्थन असल्याचे सांगितले आहे. सरकारमध्ये कसलाही वाद नाही, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...