आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवस्मारक समितीवरून विनायक मेटे यांना हटवण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी या समितीचे अध्यक्ष अामदार विनायक मेटे हे व्यापाऱ्यांकडून पैसे गोळा करत असल्याचा आरोप करत विश्व वाल्मीकी सेनेने शिवस्मारक समितीवरून मेटे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठी विधानभवनावर शुक्रवारी मोर्चाही काढण्यात आला.
  
विधानभवनाच्या गेटवर दुपारी चारच्या दरम्यान विश्व वाल्मीकी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हाती झेंडे आणि फलक घेऊन ‘विनायक मेटे हटाओ, शिवस्मृती बचाव’, अशा घोषणा देण्यात येत हाेत्या. पाेलिसांनी प्रवेशद्वारापर्यंत येण्यापूर्वीच माेर्चेकऱ्यांना अडविले.
 
विश्व वाल्मीकी सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पी. के. साळुंके यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले की, मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने तीन हजारांपेक्षा जास्त कोटींची तरतूद केलेली आहे. या स्मारकासाठी लागणारा सर्व पैसा सरकार देणार आहे. परंतु अामदार विनायक मेटे यांनी काही व्यापाऱ्यांकडून शिवस्मारकासाठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आमच्याकडे याबाबत अनेक व्यापाऱ्यांनी तक्रार केल्या अाहेत. त्यामुळे आम्ही पुणे येथे मेटे यांच्याविराेधात आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. मात्र, त्याचा काहीच उपयोग न झाल्याने मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला. वर्षा बंगल्यावर मोर्चा नेऊन निवेदन देणार होतो. परंतु, मुख्यमंत्री वर्षावर नसल्याचा निरोप पोलिसांनी दिल्याने आम्ही विधानभवनावर मोर्चा आणला आहे. या प्रकरणी विनायक मेटे यांनी या प्रकरणी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
बातम्या आणखी आहेत...