आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्वबदल : मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर अँटोनी समिती नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभेतील पराभवानंतर नेमण्यात आलेल्या काँग्रेसचे सरचिटणीस ए.के. अँटोनी समितीच्या अहवालात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर असमाधान व्यक्त करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सोनिया गांधी यांना हा अहवाल मंगळवारी सादर केला जाईल. त्यामुळे राज्यात पुन्हा नेतृत्वबदलाच्या चर्चांना ऊत आला आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर खडबडून जाग्या झालेल्या काँग्रेसने महाराष्ट्र, आसाम आणि हरियाणा या तीन काँग्रेसशासित राज्यांतील पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस ए.के. अँटोनी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. तिन्ही राज्यांतील प्रमुख नेते आणि पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर अँटोनी समितीने आपला अहवाल तयार केला असून मंगळवारी तो सोनिया गांधींना सादर करण्यात येणार आहे. या अहवालात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या दोघांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीविषयी राज्यातील महत्त्वाच्या कॉँग्रेस नेत्यांमध्येच नाराजी असून त्यापैकी अनेक नेत्यांनी आपली नाराजी या समितीसमोर व्यक्त केली होती. तसेच मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. हा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर येत्या दोन तीन दिवसांत सोनिया गांधी निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभेतल्या पराभवानंतरच राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या घडामोडींना वेग आला होता. मात्र त्यावेळी काही अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुखांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांनी हायकमांडची नाराजी दूर करण्यात यश मिळवले होते.

राष्ट्रवादी कॉँग्रेसलाही दिले संकेत
राज्यात येत्या काही दिवसांत नेतृत्वबदल होऊ शकतो असे संकेत काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून मित्रपक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला देण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सुरू आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नेतृत्वबदल केला जाणार का असा प्रश्न काही पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नवी मुंबईत झालेल्या पक्षाच्या निर्धार मेळाव्यात केला असता, ' त्याबाबतचा निर्णय आमचे आमदार घेतील, आमच्या आमदारांनी तशी मागणी केल्यास राष्ट्रवादीच्याही राज्यातल्या नेतृत्वात बदल करू ' असे उत्तर पवारांनी दिले.